भारतीय संघाचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारी (१९ जानेवारी) संपला. या दौऱ्याचा शेवट भारतीय संघाने ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर विजय मिळवून गोड केला. गेल्या ३२ वर्षात या स्टेडियमवर अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारत भारताने इतिहास रचला. तसेच या सामन्याबरोबरच भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील २-१ अशा फरकाने मालिका जिंकत आपल्याकडेच राखली. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय संघाचे कौतुक केवळ भारतातच नाही जर अनेक देशांमधून करण्यात येत आहे. यात पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तानी खेळाडूच नाही तर पाकिस्तानमधील मीडियानेही भारताचे गोडवे गायले आहेत. नुकताच पाकिस्तानमधील २४/७ उर्दू न्यूज चॅनलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बाबर हयात या न्यूजअँकरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भारतीय संघावर भरभरुन स्तुतीसुमने उधळली आहे.
विशेष म्हणजे ही कसोटी मालिका सुरु असताना पहिल्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. तसेच या मालिकेदरम्यान भारताचे जवळपास ९-१० खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. शेवटच्या सामन्यात तर जवळपास १ आणि २ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेलेच खेळाडू संघात अधिक होते. अशा परिस्थितही युवा भारतीय संघाने अनुभवी आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला नमोहरन केले. त्यामुळे बाबर हयात या पाकिस्तानच्या न्यूजअँकरनेही भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
पाकिस्तानातून कौतुक
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की बाबर हयात भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणत आहेत की ‘युवकांच्या हातून ऑस्ट्रेलियाची धुलाई. बोली भाषेत तर असेच म्हणाता येईल की युवा पिढीच्या हातून ऑस्ट्रेलियाची धुलाई झाली आहे. पाहा तर, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत आणि मग मोहम्मद सिराज, सर्वांनीच चांगला खेळ केला. काय परिस्थितीत हा विजय मिळवला; कधी खेळाडूंवर वर्णभेदी टीका केली गेली, कधी दुसरी संकटं, खेळाडू दुखापतग्रस्त होत होते, संघाचा नियमित कर्णधार मायदेशी परतला होता. विराटला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर संघाकडूनही शानदार विजयाची भेट मिळाली.”
पुढे ते म्हणाले, ‘या विजयाला तुम्ही आत्तापर्यंतचा सर्वोत्तम मालिका विजय म्हणू शकता. सिराजची काय शानदार कामगिरी होती. एका डावात तू ५ विकेट्स (ब्रिस्बेन कसोटीत) घेतल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाले. भारताविरोधात इतक्या गोष्टी या मालिकेदरम्यान घडल्या, पण म्हणतात ना कसोटी क्रिकेटचं खऱ्या स्वभावाचं दर्शन घडवते. भारताने या मालिकेत आपल्या स्वभावाचे दर्शन घडवले आहे. त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे.
हयात यांनी ते भारतीय संघाचे चाहते झाल्याचे सांगताना म्हटले, ‘मी क्रिकेटचा चाहता नसूनही मी आज दिवाना झालो आहे. मला हे सांगताना कोणताही संकोच वाटत नाही, की मी भारतीय क्रिकेट संघाचा दिवाना झालो आहे. भारतीय संघाने ज्याप्रकारे जबरदस्त कामगिरी केली, त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. आपण पाकिस्तानकडून भारतीय संघाला आणि भारतीय चाहत्यांना शुभेच्छा देऊ.’
Pakistani media on India's victory. 😎 pic.twitter.com/XzAcM5Di0p
— Trendulkar (@Trendulkar) January 19, 2021
ब्रिस्बेन कसोटी विजय –
ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.
मालिका विजय –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर विराटने पालकत्व रजा घेतल्याने उर्वरित सामन्यांत रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटीत विजय मिळवले, तसेच सिडनी येथे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.
महत्त्वाच्या बातम्या –
जोश मे खोया होश! कसोटी मालिका विजयाच्या आनंदात रोहितच्या तोंडून निघाले अपशब्द, व्हिडिओ व्हायरल
पुजाराच्या जखमांवर त्याच्या चिमुकलीने शोधला ‘क्यूट’ उपाय, वाचून तुम्हीही व्हाल भावूक
सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यामागे ‘या’ व्यक्तीचे आहे मोठे योगदान