ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झालेल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्व सहभागी संघांनी आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. अखेर भारत आणि न्यूझीलंड हे इतर संघांवर वरचढ ठरले आणि अंतिम सामन्यात धडक मारली. साउथम्पटन येथे झालेल्या या बहुप्रतिक्षित सामन्यात विराट आणि त्याच्या ब्रिगेडकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु न्यूझीलंडने ८ विकेट्सने भारताचा धुव्वा उडवत कोट्यावधी चाहत्यांची मने तोडली.
या ऐतिहासिक सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या ताफ्यात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. तत्पुर्वी मिळालेल्या अवधीत, भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वपुर्ण बदल करत संघाला भक्कम बनवण्याच्या प्रयत्नात असेल. (Team India May Go Through These Changes In Playing XI After Defeat In WTC Final)
साउथम्पटन येथील ऐतिहासिक कसोटी सामन्यात गोलंदाजांसह भारताच्या फलंदाजानीही निराशादायी प्रदर्शन केले होते. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ १३९ धावांचे आव्हान मिळाले होते. यामुळे संघ व्यवस्थापन नक्कीच भारताच्या फलंदाजी क्रमात बदल करण्यावर भर देईल.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोहली
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो विशेष खेळी खेळू शकला नव्हता. पहिल्या डावात ४४ तर दुसऱ्या डावात अवघ्या १३ धावांवर त्याला पव्हेलियनला परतावे लागले होते. अशात तो आपल्या आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
याबरोबरच मधल्या फळीत कसोटी विशेषज्ञ हनुमा विहारी आणि केएल राहुल यांना संधी दिली जाऊ शकते. अशात सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला चेतेश्वर पुजारा याचे स्थान काहीसे धोक्यात आल्यासारखे दिसत आहे. मागील २ वर्षांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन इतर फलंदाजाला त्याच्याजागी आजमावून पाहू शकते.
गोलंदाजी विभागातही होतील बदल
केवळ फलंदाजी नव्हे तर गोलंदाजी विभागातही बदल होऊ शकतात. इंग्लंडची वेगवान गोलंदाजीस पोषक खेळपट्टी पाहता कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अनुभवाला प्राधान्य देण्यात आले होते. परंतु ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे संघाच्या अपेक्षांवर खरे उतरु शकले नाहीत. दुसरीकडे मोहम्मद शमीने आपल्या धारदार गोलंदाजीचे दर्शन घडवले होते. त्याने पूर्ण सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. अशात इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही त्याला अजून एक संधी दिली जाऊ शकते.
शमीच्या जोडीला वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराजला जागा मिळणे जवळपास निश्चित आहे. याबरोबरच उमेश यादव किंवा शार्दुल ठाकूर यांनाही सहभागी केले जाण्याची शक्यता आले.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/ उमेश यादव
महत्त्वाच्या बातम्या-
जगात ५१०० क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
पराजयानंतर नेतृत्त्वपद सोडा कोहलीला WTC प्लेइंग XIमध्येही मिळाली नाही जागा, पाहा संपूर्ण संघ
यजमानांचा श्रीलंकेला व्हाईटवॉश, मलानच्या तूफानी खेळीने इंग्लंडचा टी२० मालिकेत ३-०ने विजय





