भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत इंग्लंड संघाने २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी गुरुवार रोजी (१८ मार्च) होणारा चौथा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाकडे मालिका बरोबरीत आणायची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आपल्या संघात कोणते महत्वाचे बदल करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच या ४ गोष्टी भारतीय संघाने योग्यरीत्या केल्या; तर भारताला हा सामना जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही.
सलामीवीरांनी फलंदाजीमध्ये सुधार करणे गरजेचे
भारतीय संघाने पहिल्या ३ टी२० सामन्यांसाठी ४ सलामीवीर फलंदाजांचा उपयोग केला आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला आले होते. परंतु ते स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इशान किशन आणि केएल राहुल सलामीला होते. इशानने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले, परंतु केएल राहुल या सामन्यात देखील अपयशी ठरला होता. त्याचप्रमाणे तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे येणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाजांकडून चांगली सुरुवात करून देण्याच्या अपेक्षा असणार आहे.
संघातील ११ खेळाडूंची निवड
भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यापासूनच असंतुलित दिसून येत आहे. भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संघ बांधणी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ते संघात नवीन खेळाडूंना संधी देत आहेत. तसेच भारतीय संघ चार गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासोबत मैदानात उतरत आहे. यामुळे जर भारतीय संघाला दुसऱ्या डावात गोलंदाजी करावी लागली; तर भारतीय गोलंदाजांना धावा वाचवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे भारतीय संघाने ५ गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवं.
गचाळ क्षेत्ररक्षण
भारतीय संघ क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणून ओळखला जातो. परंतु या मालिकेत भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण केले आहे. स्वतः विराट कोहलीने या मालिकेत झेल सोडले आहेत; तर दुसरीकडे इंग्लिश खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत आहेत. त्यामुळे जर भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून झेल टिपावे लागतील.
इंग्लिश गोलंदाजांनी शॉर्ट चेंडू टाकून दिला त्रास
भारतीय फलंदाजांना इंग्लिश संघाचे जलद गती गोलंदाज मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर यांनी खूप अडचणीत टाकले आहे. सतत शॉर्ट पीच गोलंदाजी होत असल्यामुळे, भारतीय संघातील फलंदाजांना धावा करणे कठीण जात आहे. अहमदाबादच्या वेगवान खेळपट्टीवर टाकलेला शॉर्ट चेंडू भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत आहे. त्यामुळे चौथ्या टी२० सामन्यात भारतीय फलंदाजांना शॉर्ट चेंडूचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल संघात कायम, तर आयपीएलचा धडाकेबाज अष्टपैलू करणार पदार्पण? ‘अशी’ असेल भारताची प्लेइंग XI
आयपीएल २०२१ साठी ‘मिस्टर आयपीएल’ने कसली कंबर, पाहा त्याची जोरदार फटकेबाजी
कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज






