शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा श्रीलंका दौरा गुरूवारी (२९ जुलै) संपन्न होईल. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. सध्या १-१ अशी बरोबरीत असलेली ही मालिका जिंकून मायदेशी परतण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल. तर, दुसरीकडे वनडे मालिकेतील पराभवाची परतफेड करत टी२० मालिका आपल्या नावे करण्याचा यजमान श्रीलंका प्रयत्न करणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत आपण जाणून घेऊया.
भारताकडे कमी पर्याय
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. या दरम्यान त्याच्या संपर्कातील इतर आठ खेळाडूंना देखील क्वारंटाईन केले गेले आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ केवळ ५ फलंदाजांनिशी मैदानात उतरला. या सामन्यासाठी भारतीय संघात ४ नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली.
अंतिम सामन्यात होऊ शकतो बदल
सध्या भारतीय संघाकडे केवळ ११ खेळाडू उपलब्ध आहेत. या दौऱ्यावर संघासाठी नेट बॉलर म्हणून गेलेल्या अर्शदीप सिंग, सिमरजीत सिंग, संदीप वॉरियर व साईकिशोर यांना प्रमुख संघात सामील केले गेले आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा दुखापतग्रस्त झाला होता. मिळत असलेल्या माहितीनुसार, तो मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी उपलब्ध नसेल. असे झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत आणखी एका खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते.
संघाकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार केल्यास संघ व्यवस्थापन संदीप वॉरियर याला संधी देण्याची चिन्हे आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षापासून केरळ व तमिळनाडूसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसेच, तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
असा असू शकतो तिसऱ्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, चेतन साकरीया, वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर.
महत्ताच्या बातम्या –