---Advertisement---

मालिका वाचवण्यात ‘या’ 3 भारतीय धुरंधरांनी लावली सगळी ताकद, एक गोलंदाजीत, तर दोघे फलंदाजीत चमकले

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 1:35 PM
Tilak-Varma
---Advertisement---

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या 3 शिलेदारांमुळे वेस्ट इंडिज संघाला सलग तिसरा विजय मिळवण्यापासून रोखण्यात यश आले. हा सामना भारताने 7 विकेट्स राखून आपल्या नावावर केला. तसेच, मालिकेत 1-2ने पुनरागमनही केले. आता भारताला विजय मिळवून देणारे 3 शिलेदार कोण, हे आपण जाणून घेऊयात…

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 159 धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी हा ‘करो या मरो’ सामना होता. मात्र, संघाने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत 164 धावा केल्या आणि सामना 7 विकेट्सने जिंकला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) चमकले.

तत्पूर्वी गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) चमकला. कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात यजमानांच्या फलंदाजांना अडकवले. तसेच, फलंदाजीत सूर्यकुमार आणि तिलकने गोलंदाजांची चांगलीच धुलाी केली. चला तर, भारताच्या या 3 हिरोंविषयी जाणून घेऊयात…

1. सूर्यकुमार यादव
वेस्ट इंडिजने विजयासाठी भारतापुढे 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 2 विकेट्स लवकर गमावल्या होत्या. अशात खेळपट्टीवर आलेल्या भारतीय संघाचा ‘मिस्टर 360’ सूर्यकुमार यादवने यजमान विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. त्याने 44 चेंडूत 83 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याने चारही बाजूंना फटकेबाजी केली. त्याने या खेळीत 4 षटकार आणि 10 चौकारांचाही पाऊस पाडला.

2. तिलक वर्मा
यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल फ्लॉप झाल्यानंतर सूर्याची साथ देण्यासाठी मैदानावर तिलक वर्मा उतरला होता. यावेळी तिलक सांभाळून खेळत स्ट्राईक बदलत राहिला. ज्यावेळी सूर्या एका बाजूने वेगवान धावा करत होता, तेव्हा दुसऱ्या बाजूने तिलक एक-एक धाव घेऊन त्याला स्ट्राईक देत होता. मध्ये-मध्ये त्यानेही कमकुवत चेंडूंवर फटकेबाजी केली. तिलकने या सामन्यात 37 चेंडूंचा सामना करताना 49 धावा चोपल्या. तसेच, संघाला विजय मिळवून दिला. तिलकने या खेळीदरम्यान 132.43च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 1 षटकार आणि 4 चौकार मारले.

3. कुलदीप यादव
दुसऱ्या टी2 सामन्यात विश्रांती केल्यानंतर कुलदीप यादव याने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत आपल्या फिरकीची जादू दाखवली. चायनामन गोलंदाजाने 4 षटके गोलंदाजी करत 28 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. त्याने ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांच्या विकेट्स घेतल्या. कुलदीपने या तिन्ही विकेट्ससह आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील आपल्या 50 विकेट्सचा टप्पा पार केला.

कुलदीप भारताकडून या क्रिकेट प्रकारात सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनाही पछाडले आहे. चहलने 50 विकेट्स घेण्यासाठी 34 सामने खेळले होते, तर बुमराहने 41 सामन्यात ही कामगिरी केली होती. दुसरीकडे मात्र कुलदीपने 30व्या सामन्यातच हा पराक्रम गाजवला आहे. (team india three heroes in third t20 match played against west indies know here)

महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपपूर्वी युवराजचे विचार करायला भाग पाडणारे विधान; म्हणाला, ‘रोहित चांगला कर्णधार, पण…’
‘मला बाबरसोबत लग्न करायचं आहे’, माजी पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने माजली खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---