श्रीलंकेत झालेल्या आशिया चषकात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता आगामी वनडे विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. त्यानंतर विश्वचषकातील भारताचा अखेरचा सामना 12 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यास 19 नोव्हेंबरपर्यंत भारतीय संघाला सातत्याने खेळावे लागणार आहे. यादरम्यान भारतीय संघ संपूर्ण देशभरात प्रवास करेल. आपण जाणून घेऊया भारतीय संघ यावेळी कोणकोणत्या शहरांमध्ये खेळताना दिसेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला 22 सप्टेंबरपासून मोहाली येथे सुरुवात होईल. त्यानंतर 24 व 27 सप्टेंबर रोजी भारतीय संघ अनुक्रमे इंदोर व राजकोट येथे खेळेल. यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या मिशन वर्ल्डकपला सुरूवात होईल. 30 सप्टेंबर रोजी भारतीय संघ विश्वचषकाआधी पहिला सराव सामना गुवाहाटी येथे तर दुसरा सराव सामना तिरुअनंतपुरम येथे 3 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.
अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे अफगाणिस्तानविरुद्ध तर 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी पुणे येथे बांगलादेशविरुद्ध, 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध, 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाचा सामना होईल.
विश्वचषकाच्या अखेरच्या टप्प्यात 2 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ मुंबई येथे श्रीलंकेविरुद्ध, 5 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि अखेरीस 12 नोव्हेंबर रोजी बेंगलोर येथे नेदरलँडविरुद्ध भारताचा अखेरचा साखळी सामना होईल. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास मुंबई अथवा कोलकाता येथे भारताचा सामना होईल. तर, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने भारतीय संघ सातत्याने प्रवास करून खेळताना दिसेल.
(Team India Travel Next Two Months For ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज