सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिय दौऱ्यावर आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे. भारतीय संघ तब्बल सात वर्षांनंतर बांगलादेश दौरा करणार असल्यामुळे संघासाठी ही नक्कीच खास गोष्ट आहे. संघाला या दौऱ्यात यजमान बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याविषयी गुरुवारी (20 ऑक्टोबर) पुष्टी केली.
भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकातील अभियानाची सुरुवात करेल. भारताला विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्याचे आधीच ठरले आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. आता भारतीय संघ या मालिकेनंतर डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिक ढाकाच्या मीरपुरमध्ये शेर ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 7 डिसेंबर रोजी खेळला जाईल. तर तिसरा आणि सेवटचा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर उभय संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चटगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर रोजी ढाकामध्ये आयोजित केला जाईल.
बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्याविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये. परंतु बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांविषयी पुष्टी दिली आहे. बांगालदेश क्रिकेट बोर्डचे प्रमुख नजमुल हसन याविषयी बोलताना म्हणाले की, “अलिकडच्या काळात बांगलादेश आणि भारत यांच्यात काही अप्रतिम सामने खेळले गेले आहेत. दोन्ही देशांतील चाहते अजून एक अविस्मरणीय मालिका पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.”
बांगलादेश आणि भारतात होणारी ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने पाहिले, तर ही मालिका महत्वाची असेल. कारण अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला पुढचे जवळपास सर्व कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! महत्त्वाच्या टी20 स्पर्धेतून बाहेर पडला ‘हा’ भारतीय खेळाडू, तुम्हालाही वाटेल चिंता
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट