---Advertisement---

टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारे संघ, भारत ‘या’ क्रमांकावर

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 2:53 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व १६ संघांची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच टी२० विश्वचषक खेळेल. २००७ पासून भारतीय संघाने विश्वचषक जिंकलेला नाही. या विश्वचषकाच्या निमित्ताने आपण टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद झालेल्या १० संघांविषयी जाणून घेणार आहोत.

१) नेदरलँड्स-
टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम नेदरलँड्स संघाच्या नावावर आहे. २०१४ टी२० विश्वचषकात श्रीलंकेने त्यांना अवघ्या ३९ धावांमध्ये गुंडाळले होते. त्यानंतर श्रीलंकेने हे आव्हान एक गडी गमावत पूर्ण केले.

२) न्यूझीलंड-
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ असून, त्यांनाही श्रीलंकेनेच २०१४ टी२० विश्वचषकात ६० धावांत बाद केले होते. श्रीलंकेने हा सामना ५९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला.

३) आयर्लंड-
वेस्ट इंडीज येथे झालेल्या २०१० टी२० विश्वचषकात यजमानांनी आयर्लंडचा डाव ६८ धावांवर गुंडाळत ७० धावांनी मोठा विजय साकारला होता.

४) हॉंगकॉंग-
सन २०१४ टी२० विश्वचषकात नेपाळने दिलेले १५० धावांचे आव्हान पार करताना हॉंगकॉंगचा डाव ६९ धावांवर संपलेला.

५) बांगलादेश-
भारतात झालेल्या २०१६ टी२० विश्वचषकावेळी न्यूझीलंडने बांगलादेशचा डाव ७० धावांवर संपुष्टात आणलेला. केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने या सामन्यात ७५ धावांनी मोठा विजय मिळवलेला.

६) अफगाणिस्तान-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन काही वर्षे झालेल्या अफगाणिस्तानला २०१४ टी२० विश्वचषकात यजमान बांगलादेशने ७२ धावांवर सर्वबाद करत ९ गड्यांनी मोठा विजय संपादन केला होता.

७) केनिया-
दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडने केनियाला ७३ धावांवर गुंडाळले होते. त्यानंतर त्यांनी ९ गडी राखून मोठा विजय मिळवलेला.

८) भारत-
टी२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणाऱ्या संघांमध्ये आठव्या स्थानी भारतीय संघ आहे. २०१६ मध्ये नागपूर येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा डाव अवघ्या ७८ धावांमध्ये संपुष्टात आणला होता.

९) अफगानिस्तान-
या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर पुन्हा एकदा अफगाणिस्तानला स्थान मिळाले आहे. २०१२ टी२० विश्वचषकात इंग्लंडने त्यांना ८० धावांवर बाद करत ११६ धावांनी मोठा विजय मिळवलेला.

१०) अफगाणिस्तान-
या नकोश्या यादीत दहाव्या क्रमांकावर देखील अफगाणिस्तानच आहे. २०१० मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळत असताना दक्षिण आफ्रिकेने त्यांना ८० धावांवर बाद केलेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---