ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटले आहे की कोरोना व्हायरसमुळे कसोटी क्रिकेटवर खूप नकारात्मक परिणाम होईल. अशा परिस्थितीत कसोटीचे भविष्य वाचविण्याची गुरुकिल्ली भारतीय क्रिकेट संघाच्या हातात आहे.
प्लेअर राइट फाउंडेशनच्या फेसबुक अकाउंटवर लाईव्ह चॅट दरम्यान चॅपेल म्हणाले, ‘ज्या दिवशी भारत कसोटी क्रिकेट खेळणे बंद करेल त्याच दिवशी कसोटी क्रिकेटचा मृत्यू होईल. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इतर कोणताही देश कसोटी क्रिकेटच्या प्रगतीसाठी युवा क्रिकेटपटूंमध्ये गुंतवणूक करत असल्याचे मला दिसत नाही.’
चॅपल पुढे म्हणाले, ‘मी टी२० क्रिकेटविरुद्ध नाही. लोकांमध्ये त्याची विक्री करणे सोपे आहे. परंतु कसोटी क्रिकेटसाठी आर्थिक बाबी महत्त्वाच्या आणि मोठ्या असणार आहेत. पण दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जर म्हणतो की, कसोटी क्रिकेट सर्वोच्च असेल तर त्याच्या म्हणण्यामुळे कसोटीच्या अस्तित्वाची आशा आहे.’
चॅपेल यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद ज्यावेळी सांभाळले त्यावेळी अनेक वाद झाले होते. या वादांमुळे आणि २००७ मध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडल्याने चॅपेल यांना प्रशिक्षकपदावरुन काढून टाकण्यात आले होते.
पण असे असले तरी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सलग १७ वनडे सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले होते. तसेच वेस्ट इंडिजमध्येही ३५ वर्षांनंतर भारताला कसोटी मालिका जिंकण्यात यश आले होते. तसेच जेव्हा भारतीय संघात एमएस धोनी नवीन होता त्याच काळात चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यामुळे धोनीने सुरुवातीची कारकिर्द त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडली.
चॅपेल यांनी फेसबुकवर बोलताना धोनीचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘जेव्हा मी धोनीला फलंदाजी करताना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला धक्का बसला. त्यावेळी तो भारताच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक होता. तो असाधारण पद्धतीने चेंडू मारायचा. मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या खेळाडूंपैकी तो एक सर्वात शक्तिशाली खेळाडू आहे.’
ट्रेंडिंग घडामोडी –
कोहलीशी तुलना होणारा खेळाडू पाकिस्तानचा नवा कर्णधार
न्यूझीलंडला विश्वचषक फायनलमध्ये पोहचविणारा ‘खेळाडू’ शोधतोय नोकरी
दोन विश्वचषकात चांगली कामगिरी करुनही २०१४मध्ये माझ्या घरावर फेकले होते दगडं