-महेश वाघमारे
सहा फूट दोन इंच उंची, अंगापिंडाने एकदम मजबूत, क्रिकेट खेळाडू कमी आणि रग्बीचा किंवा डब्ल्यूडब्ल्यूईचा खेळाडू वाटावा असे शरीर. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, सलामीला येऊन कसलीही दयामाया न दाखवता, अतिशय क्रूरतेने विरुद्ध संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडण्याची वृत्ती. एकदाका हेडन सुरू झाला म्हणजे, गोलंदाजांचा वाईट काळ सुरू झाला हे ठरलेले असायचे. जोपर्यंत हेडन मैदानावर आहे तोपर्यंत चौकार-षटकार पडणारच हे सर्वांना माहित होते.
अशीच एक खेळी हेडनने झिम्बाब्वे विरुद्ध केली होती. २००३ मध्ये झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात नेहमीप्रमाणेच रथी-महारथी भरलेले होते. झिम्बाब्वेचा संघ त्यामानाने अतिशय दुबळा वाटतं होता. प्रसिद्ध खेळाडूंच्या नावे फक्त हीथ स्ट्रीक एकटाच होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर होता.
हीथ स्ट्रीकने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्याचा हा निर्णय किती महागात पडणार आहे, याची स्ट्रीकला जराशिही कल्पना नव्हती. कारण, या सामन्यात इतिहास लिहिला जाणार होता.
२००१ भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला. तरीही, तेव्हापासून हेडन मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये होता. भारताविरुद्ध तीन सामन्यात त्याने तब्बल ५४९ धावा कुटल्या होत्या. पुढील दीड वर्ष ही त्याचा फॉर्म तसाच राहिला.
जस्टिन लैंगरसोबत त्याने ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात केली. त्यावेळी हेडन, लैंगर, पॉंटिंग, वॉ, गिलख्रिस्ट, लेहमन इतकी तगडी फलंदाजांची फळी ऑस्ट्रेलियाकडे होती. दोघांनी ऑस्ट्रेलियाला आश्वासक सुरुवात दिली. लैंगर आपल्या नेहमीच्या पद्धतीविरुद्ध वेगवान खेळत होता. दुसरीकडे हेडनने सावध सुरुवात केली होती. पहिल्या १० षटकातच ऑस्ट्रेलियाने आपले अर्धशतक पूर्ण केले. लैंगर अतिआक्रमकतेच्या नादात इर्विनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या सत्राचा उर्वरित वेळ खेळण्यासाठी रिकी पॉंटिंग मैदानात उतरला. पॉंटिंगने लैंगरचाच कित्ता गिरवत चौकार लगावले. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने एक गडी गमावत ९१ धावा काढल्या होत्या.
दुसऱ्या सत्राच्या सुरवातीलाच पाँटिंग परतला. हेडनने आपले अर्धशतक पूर्ण केले. नवीन फलंदाज डेमियन मार्टिननेसुद्धा झिम्बाब्वेची गोलंदाजी फोडून काढायला सुरुवात केली. आज प्रत्येक ऑस्ट्रेलियन फलंदाज चांगलेच हात धू्वून होता. हेडनने पण हात खुले करत वेग वाढवला आणि आपले शतक धडाक्यात साजरे केले. मार्टिन अवघ्या ७६ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. हेडनच्या साथीला आलेल्या कर्णधार स्टीव्ह वॉने आपल्या सहकाऱ्यांनी राखलेली धावगती तशीच सुरू ठेवली. खराब चेंडूवर चौकार वसूल करत तो हेडनला साथ देऊ लागला. दोघेही जोखीम न घेता ऑस्ट्रेलियाचा धावफलक पुढे पुढे नेत होते. हेडनने याच दरम्यान आपले दीड शतक पूर्ण केले. दिवसाअखेर, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ३७२ धावा जमा झाल्या होत्या. हेडन १८३ तर वॉ ६१ धावांवर नाबाद होता.
दुसऱ्या दिवशीसुद्धा दोघांनी पहिल्या दिवशीच्याच वेगाने डाव सुरू केला. हेडनने दिवसातील पाचव्या षटकातच आपले द्विशतक पूर्ण केले. झिम्बाब्वेच्या अननुभवी गोलंदाजांची त्याने वाताहात केली होती. वॉ शतकाकडे मार्गक्रमण करत असतानाच ७८ धावांवर इर्विनच्या हाती झेल देत परतला. डॅरेन लेहमन ताबडतोड ३० धावांची खेळी करत माघारी गेला. त्या एका सत्रात ऑस्ट्रेलियाने तब्बल १५२ धावा फटकावल्या होत्या. यात हेडनचे योगदान होते ८८ धावांचे.
लंचनंतर खेळ सुरू झाला. ॲडम गिलख्रिस्ट व हेडनने कसोटीला टी२० मध्ये रूपांतरित केले. दीड दिवस हेडनने मारून मारून गोलंदाजांना थकवले असताना गिलख्रिस्ट ने तुफान फटकेबाजी सुरु केली. हेडनने आपल्या कारकीर्दीत प्रथमच ३०० धावांचा टप्पा पार केला. तो त्रिशतक करणारा पाचवा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला. कर्णधार वॉच्या मनात डाव घोषित करण्याचा विचार आला. पण, ॲडम गिलख्रिस्टने अवघ्या ४६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. अजून सामन्यात बरेच दिवस शिल्लक असल्याचे पाहून त्याने डाव सुरू ठेवला.
त्रिशतकानंतरही हेडन थांबायचं नाव घेत नव्हता. त्याने अगदी शेवटच्या गीअरमध्ये आपली फलंदाजी नेली. डॉन ब्रॅडमन व मार्क टेलर (३३४) यांना मागे टाकत त्याने ऑस्ट्रेलियासाठीच्या कसोटी सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येला गवसणी घालत ३५० धावा पूर्ण केल्या.
दुसरीकडे, गिलख्रिस्टने तर कहरच केला होता. १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने त्याने फक्त ८४ चेंडूत आक्रमक शतक झळकावले. त्यावेळी अशी खेळी वनडेमध्ये देखील पाहायला मिळत नसत.
हेडनने ३५० चा टप्पा पार केल्यानंतर सर्वांना ब्रायन लाराच्या ३७५ धावांची आठवण झाली. १९९४ मध्ये लाराने इंग्लंड विरुद्ध ही खेळी साकारली होती. तोपर्यंत तीच खेळी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी होती. हेडनने आपला धडाका कायम राखत लाराचा तो विक्रम मागे टाकला. सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी त्याचे अभिनंदन केले. हेडनचा वेग पाहता ४०० धावांचा विश्वविक्रम टप्प्यात दिसत होता. पण अचानक, ट्रेव्हर ग्रिपर या कामचलाऊ गोलंदाजाच्या गोलंदाजीवर तो फसला. वैयक्तिक ३८० धावांचा विक्रम त्याने बाद होण्यापुर्वी रचला होता. या खेळीसाठी तो अवघ्या ४३७ चेंडूंना सामोरा गेला. यात ३८ चौकार व ११ उत्तम षटकारांचा समावेश होता. हेडन बाद होताच, ऑस्ट्रेलियाने आपला डाव ७३५ धावांवर घोषित केला. ॲडम गिलख्रिस्ट ११४ धावा काढून नाबाद राहिला. मैदानातून परतताना मॅथ्यू हेडनला समस्त क्रिकेट चाहते व झिंबाब्वेचे खेळाडू टाळ्यांच्या गजरात मानवंदना देत होते.
पुढे, झिंबाब्वे ब्रेट ली व जेसन गिलेस्पीच्या गोलंदाजीपुढे आपल्या पहिल्या डावात २३९ धावात सर्वबाद झाली. फॉलोऑन दिल्यानंतरही, परिस्थिती तितकीशी काही सुधारली नाही. अॅन्डी बिचेलने चार बळी घेत झिम्बाब्वेचा दुसरा डाव ३२१ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने एक डाव व १७५ धावांनी मोठा विजय नोंदविला.
पुढच्याच वर्षी, लाराने काहीसा रटाळ खेळ खेळत ४०० धावांचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. परंतु, हेडनने अवघ्या दीड दिवसात झिंबाब्वेच्या गोलंदाजांची जी काय पिसे काढली होती, ते अजूनही क्रिकेटचाहत्यांच्या नजरेसमोरून जात नाही.
टेस्ट इनिंग्स स्पेशल लेखमालिकेतील वाचनीय लेख
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ६: ब्रेंडन मॅक्यूलमने भारताविरुद्ध केलेले झकास त्रिशतक
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची व्हेरी व्हेरी स्पेशल खेळी
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग २- असामान्य खेळाडूकडून झालेली असामान्य खेळी
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग १- दिग्गजांच्या मांदियाळीत गंभीरची ती अजरामर मॅरेथॉन खेळी
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज
आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!
आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार