बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दुसऱ्या उपांत्य लढतीमधील पहिल्या टप्यात रविवारी गतविजेत्या बेंगळुरू एफसीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेला 1-0 असे हरविले. पूर्वार्धात जमैकाचा 29 वर्षीय स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन याने केलेला गोल निर्णायक ठरला.
एटीकेला अखेरच्या सहा मिनिटांत तसेच चार मिनिटांच्या भरपाई वेळेसह एकूण दहा मिनिटे चांगली संधी होती. त्यावेळी बेंगळुरूचा एक खेळाडू कमी झाला होता, पण एटीकेला फायदा उठविता आला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील लढतीत (अवे मॅच) गोल करण्यात एटीकेला अपयशच आले. त्यामुळे आता पुढील रविवारी (दिनांक 8 मार्च) कोलकत्यामधील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळताना एटीकेसमोर कडवे आव्हान असेल.
बेंगळुरूने दहा संघांमध्ये 18 सामन्यांत सर्वांत कमी म्हणजे 13 गोल पत्करले होते. त्यांच्या बचाव फळीने तसेच गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने गतविजेत्यांचे नेट घरच्या मैदानावर सुरक्षित राखले. त्यामुळे अँटोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीकेची निराशा झाली. एटीकेचे डेव्हिड विल्यम्स आणि रॉय कृष्णा यांना अखेरपर्यंत भेदक चाल रचून निर्णायक गोल करता आला नाही.
बेंगळुरूचा बचावपटू निशू कुमार याला 84व्या मिनिटाला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले. एटीकेच्या डेव्हिड विल्यमने रॉय कृष्णाला पास दिला होता. त्यावेळी कृष्णाला निशूने पाडले. त्यामुळे निशूवर ही कारवाई करण्यात आली.
स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने श्री कांतीरवा स्टेडियमवर अर्ध्या तासाच्या खेळानंतर खाते उघडले. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने डावीकडून मारलेला चेंडू सुनील छेत्रीने हेडिंगवर एरीक पार्टालूकडे दिशा दिली. त्यातून जुआननने ही चाल पुढे नेत प्रयत्न केला. एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला चेंडू नीट अडविता आला नाही. त्याच्या हातून सुटलेला चेंडू ब्राऊनने चपळाईने नेटमध्ये घालविला.
पहिल्या सत्रात 17व्या मिनिटाला एटीकेचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. रॉय कृष्णाच्या लांब पासवर विल्यम्सने गोलक्षेत्रात मुसंडी मारत चेंडू नेटमध्ये घालविला, पण लाईनम्समनने हँडबॉलचा इशारा करीत हा गोल ऑफसाईड ठरविला. विल्यम्सने चेंडूवर ताबा मिळविताना हाताचा वापर केल्याचे रिप्लेत दिसून आले.
बेंगळुरूने आक्रमक सुरवात केली. सातव्याच मिनिटाला उल्लेखनीय प्रयत्न झाला. डिमास डेल्गाडोच्या पासवर राहुल भेकेने हेडिंग केले, पण चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.