दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक जॉन बुकानन यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाचा संघ क्रिकेटविश्वावर एकछत्री राज्य करत होता. एकदिवसीय क्रिकेट असो नाहीतर कसोटी क्रिकेट, ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे म्हणजे पहाड फोडण्यासारखे काम होते. सन १९९९ पासून सुरू झालेला हा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच थांबला. या एका दशकात ऑस्ट्रेलियाने तीन विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी व सलग १६ कसोटी मालिका विजय साजरे करण्याचा पराक्रम केला होता. त्या ऑस्ट्रेलिया संघात स्टीव वॉ, रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलख्रिस्ट, अँड्र्यू सायमंड्स यासारखे एकाहून एक आक्रमक फलंदाज होते. या फलंदाजांना बाद केल्यानंतर, विरोधी संघांना वाटायचे आता आपण जिंकू. पण, एक ऑस्ट्रेलियन फलंदाज या सर्वांनंतर, खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहायचा आणि ऑस्ट्रेलियाला विजयी करायचा. अगदी ऑस्ट्रेलियाचे सुरुवातीचे फलंदाज बाद झाले तरी पाठीराखे निवांत असायचे. कारण त्यांच्या विश्वास होता तो ऑस्ट्रेलियातील तेव्हाच्या त्या स्टार खेळाडूवर. तो अर्थातच ऑस्ट्रेलिया संघातील सर्वात विश्वासू फलंदाज, ‘ऑस्ट्रेलियन वॉल’ म्हणून ओळखला जाणारा तो फलंदाज म्हणजे डेमियन मार्टिन.
बहिणींसोबत करत असे क्रिकेटची प्रॅक्टिस
ऑस्ट्रेलियाच्या डार्विन शहरात २१ ऑक्टोबर १९७१ ला मार्टिनचा जन्म झाला. मार्टिन तीन वर्षांचा होता, तेव्हा ऑस्ट्रेलियातील तुफान चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळात मार्टिनचे घर उद्ध्वस्त झाले. त्यादिवशी मार्टिनच्या परिवाराने एका डायनिंग टेबलखाली बसून आपले प्राण वाचवले होते. पुढे, मदतकार्य मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला पर्थ येथे हलविण्यात आले. त्याच्या कुटुंबाने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात पर्थ येथे केली.
ज्याप्रकारे, इतर अनेक खेळाडू अभ्यासाव्यतिरिक्त मैदानावर जास्त दिसत असे तशाच खेळाडूंपैकी मार्टिन एक होता. तो सतत क्रिकेटचा विचार करत असत. आपल्या दोन लहान बहिणींसोबत तो घराच्या अंगणात क्रिकेट खेळायचा. त्याच्या दोन बहिणीच त्याचे दोन संघसहकारी असल्याने, तो त्यांना तासनतास गोलंदाजी करायला लावत असे.
गाजवला पहिला देशांतर्गत क्रिकेट हंगाम
पर्थमधील शालेय क्रिकेट वर्तुळात, मार्टिनसारखा दुसरा खेळाडू त्यावेळी नव्हता. प्रत्येक सामन्यागणिक त्याची कामगिरी उत्तमोत्तम होत होती. शालेय क्रिकेट संपताच त्याची निवड ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमी’मध्ये झाली. या अकादमीत ऑस्ट्रेलियातील गुणवंत क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षणानंतर एका वर्षातच सन १९९१ मध्ये त्याची निवड, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या प्रथमश्रेणी संघात झाली. आपल्या पहिल्याच हंगामात त्याने ५१.३७ च्या शानदार सरासरीने ८२२ धावा काढल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निराशाजनक सुरुवात
सन १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध मार्टिनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत तो काही खास कमाल करू शकला नाही. मालिकेतील पुढच्या कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ६८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. काही दिवसातच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येदेखील ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन तो आंतरराष्ट्रीय स्तरावर करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही त्याला भरपूर संधी दिली. अखेरीस, खराब कामगिरीमुळे त्याला सन १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघातून डच्चू देण्यात आला.
पुनरागमन
राष्ट्रीय संघातून बाहेर झाल्यानंतर मार्टिनने पुन्हा आपला मोर्चा देशांतर्गत क्रिकेटकडे वळवला. त्या वर्षीच्या हंगामात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने त्याला कर्णधारपदी नियुक्त केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या चुका सुधारण्यावर, मार्टिनने भर दिला. फलंदाजीचा तंत्रातही त्याने काहीशी सुधारणा केली. यानंतर, मार्टिन एक वेगळाच फलंदाज वाटू लागला. पुढील तीन-चार वर्षात मार्टिनने ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्याने धावा काढल्या. मार्टिनच्या कामगिरीकडे निवडकर्त्यांना दुर्लक्ष करता आले नाही व सन १९९८ मध्ये त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले.
ऍशेसचा हिरो
पुनरागमानंतरही, तो सातत्याने अंतिम अकराबाहेर असे. इतर प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास त्याला संधी देण्यात येई. मार्टिनने पदार्पणाच्या जवळपास नऊ वर्षानंतर आपली छाप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाडली. सन २००१ ची प्रतिष्ठित ऍशेस मालिका आपल्या फलंदाजीने गाजवत, ऑस्ट्रेलियाला ४-१ अशा फरकाने मालिका जिंकून देण्यात मार्टिनने महत्त्वाची भूमिका बजावली. हेडिंग्ले व एजबॅस्टन कसोटीत मार्टिनने झळकावलेली शतके, आजही ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी विसरू शकले नाहीत. ऍशेसनंतर झालेल्या, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत देखील त्याची बॅट तळपली. या मालिकेत देखील त्याच्या बॅटमधून दोन शतके आली. याच, वर्षी त्याला मानाचा ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला.
तुटलेल्या बोटाने मार्टिनने ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला
दक्षिण आफ्रिकेत आयोजित २००३ क्रिकेट विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला चांगलीच मजबुती दिली. संपूर्ण स्पर्धेत तो उत्तम फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असतानाच, अंतिम सामन्याच्या एक दिवसआधी सरावादरम्यान मार्टिनच्या बोटाला दुखापत झाली. संघ व्यवस्थापनाने मार्टिनला न खेळवण्याचा निर्णय घेतला. मार्टिनने कर्णधार रिकी पॉंटिंगला सांगितले की, “मला उद्या खेळायचे आहे.” मार्टीनचा फॉर्म पाहता, पॉंटिंग त्याला नाही म्हणू शकला नाही. आपल्या जखमी बोटाने खेळत, दुसऱ्या दिवशी अंतिम सामन्यात त्याने इतिहास रचला. कर्णधार पॉंटिंगसोबत २३४ धावांची नाबाद भागीदारी रचली. यात मार्टिनच्या नाबाद ८८ धावांचे योगदान होते. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली आणि ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. यानंतरही एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक धमाकेदार खेळ्या केल्या.
भारताच्या फिरकी गोलंदाजांना केले पस्त
स्टीव वॉच्या नेतृत्वात सन २००१ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला भारतभूमीवर लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. सन २००४ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वात, ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला. आधीच्या दौऱ्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियन संघ खेळला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारताचा २-१ ने पराभव केला. मार्टिनने मालिकेतील चारही सामने खेळत, ५५.५० च्या अफलातून सरासरीने ४४४ धावा जमवल्या. शानदार फलंदाजीसाठी मार्टिनला मालिकावीराचा किताब देण्यात आला. मार्टिनने, भारताच्या दिग्गज फिरकीपटूंना अत्यंत सहजतेने खेळत, सपशेल अपयशी ठरवले. या मालिकेत तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या, सलग तीन डावातील शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यात थोडक्यात अपयशी ठरला. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात आणि नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात दुर्दैवाने तो ९७ धावांवर बाद झाला. सन २००४-२००५ या काळातील तेरा महिन्यात तो कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. आंतरराष्ट्रीय कसोटीमधील कामगिरीमुळे त्याला, २००४ सालचा सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून गौरविण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील दिमाखदार कामगिरी
मार्टिनला २००५ सालच्या ऍशेस मालिकेतील खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले. मात्र, त्याने लवकरच पुन्हा संघात पुनरागमन केले. भारतामध्ये आयोजित २००६ यावर्षीची चॅम्पियन्स ट्रॉफी त्याने आपल्या फलंदाजीने गाजवली. साखळी सामन्यात दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवलेल्या, मार्टिनने वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम सामन्यात देखील ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वेस्ट इंडीजला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. या संपूर्ण स्पर्धेत मार्टिन ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
आकस्मित निवृत्ती
मार्टिनने सन २००६ ऍशेस मालिकेच्या मध्यात अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात त्याला तितकी चांगली कामगिरी करता आली नव्हती. याच नैराश्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मार्टीनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ६७ कसोटी व २०८ एकदिवसीय सामने खेळताना अनुक्रमे ४,४०६ व ५,३४६ धावा काढल्या. मार्टिनची आकडेवारी अनेकांना तितकीशी प्रेक्षणीय वाटणार नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दृष्टीने त्याने केलेल्या अनेक लहान खेळ्यादेखील तितक्याच महत्त्वाच्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिसे स्पष्ट उत्तर
हार्ट ट्रान्सप्लान्ट झालेल्या महिला चाहतीने काढले धोनीचे स्केच, ‘माही’ म्हणाला, ‘हे हृदयस्पर्शी’