हरियाणातील भिवानी हे शहर भारतीय क्रीडाक्षेत्रात चांगलेच प्रसिद्ध आहे. भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा विजेंदर सिंग याच भिवानीचा सुपुत्र. त्याच सोबत, भिवानीत ‘स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया’ अर्थात साईचे केंद्र असल्याने त्या ठिकाणी चांगले खेळाडू तयार होत असतात. पण, भिवानीमधून बॉक्सिंग, कुस्ती वा तत्सम ऑलिंपिक खेळांव्यतिरिक्त कोणी क्रिकेटपटू पुढे आलेला पहावयास मिळाले नाही. मात्र, क्रिकेटप्रेमींचा हा शोध लवकरच संपणार आहे. कारण, भिवानीचा एक वेगवान गोलंदाज क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला आहे. त्या खेळाडूचे नाव आहे मनदीप बुरा.
मनदीपची कहानी अगदी इक्बाल चित्रपटाशी मिळतीजुळती आहे. भिवानीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घिराय या गावचा तो रहिवासी. घरची परिस्थिती बऱ्यापैकी असल्याने कशाची कमी नव्हती. त्याचे वडील महेंदरसिंग हे राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू राहिले आहेत. मोठी बहीण स्वीटी बुरा ही बॉक्सिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. २०१४ लाईटहेविवेट प्रकारात तिने भारतासाठी रौप्यपदक जिंकले आहे. घरात खेळासाठी पोषक वातावरण असल्याने, मनदीपला खेळाविषयी लहानपणापासून आवड होती.
वडील बास्केटबॉलपटू तसेच बहीण बॉक्सर असली तरी मनदीपला क्रिकेटची आवड. याचमुळे त्याने घरी क्रिकेटपटू व्हायचे असे सांगताच, वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला. वडिलांची इच्छा होती की, त्याने कबड्डी अथवा बॉक्सिंगमध्ये हात आजमावून पाहावे. वडिलांनी नकार दिला तरी मोठी बहीण स्वीटी व धाकटी बहीण सीवी यांनी मनदीपला पाठिंबा दिला.
२०१२ मध्ये वडिलांच्या नकळत, स्वीटीने त्याला क्रिकेट अकादमीत दाखल केले. तेव्हापासून, मनदीप दररोज प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आसपासची सर्व मुले कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळत आहे. मनदीपच्या कष्टाचे चीज तेव्हा झाले जेव्हा, २०१८ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्याची हरियाणा संघात निवड करण्यात आली. त्यावर्षी अवघा एक सामना त्याला खेळायला मिळाला. त्या सामन्यात त्याने दोन बळी मिळवले. गेल्यावर्षी, हरियाणा सोडून त्याने सौराष्ट्राच्या तेवीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. गेल्या तीन वर्षात हरियाणा क्रिकेट वर्तुळात त्याच्या इतके ५० पेक्षा जास्त बळी कोणत्याही वेगवान गोलंदाजाने घेतले नाहीत.
द. आफ्रिकेच्या डेल स्टेनला आदर्श मानून, त्याच्यासारखीच वेगवान गोलंदाजी करणारा मनदीप सांगतो, “क्रिकेटमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. सध्या मी हरियाणा रणजी संघात असलो तरी येणाऱ्या देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी करून २०२१ आयपीएमध्ये खेळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आत्तापर्यंत माझ्या बहिणींनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहील.”
कोरोना महामारीनंतर, सुरू होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात मनदीपच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.
वाचा-
-सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीर बनला आणि इतिहास घडवला
-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज
-एमएस धोनीशी तुलना केली जाणारा पठ्या गाजवणार आयपीएल; करतोय स्मिथच्या राजस्थानकडून एंट्री