युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात अनेक युवा खेळाडू आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवत आहेत. देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी या पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनी सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर काही मोठे खेळाडू सपशेल अपयशी ठरले. आत्तापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ साखळी फेरीतूच बाहेर पडला. यासोबत, एक मजेशीर गोष्ट देखील आयपीएलमध्ये पाहायला मिळाली आहे. राहुल नाव असलेल्या क्रिकेटपटूंनी या आयपीएलमध्ये संस्मरणीय खेळ दाखवला. किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने साखळी फेरी गाजवत, सर्वाधिक धावा बनविण्यासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप आत्तापर्यंत आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतिया याने राजस्थानसाठी या हंगामात २०० धावा व १० बळी घेण्याचा कारनामा केला. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात पंजाबचा प्रमुख वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याला त्याने एका षटकात पाच षटकार मारण्याची किमया केली. या दोन राहुल व्यतिरिक्त अजूनच राहुल आपल्या संघाचा आधारस्तंभ बनलेला आहे. हा तिसरा राहुल म्हणजे मुंबई इंडियन्सचा युवा लेगस्पिनर राहुल चाहर.
दीपक चाहरचा लहान भाऊ
भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला दीपक चाहर त्याचा चुलत भाऊ. चाहर कुटुंब मूळचे राजस्थानमधील भरतपूरचे. दीपकचे वडील लोकेन्द्र हे हवाई दलात कार्यरत होते. त्यांनी दिपकला क्रिकेट खेळता यावे म्हणून एअरफोर्स कॉम्प्लेक्समध्ये एक कृत्रिम खेळपट्टी बनवून घेतली होती. पुढे, लोकेन्द्र यांची बदली झाली आणि दीपकचे लक्ष काहीसे विचलित झाले. शेवटी, मुलाला चांगले क्रिकेट खेळता यावे म्हणून लोकेन्द्र यांनी ती नोकरी सोडत, आग्रा येथे क्रिकेट अकादमी स्थापन करून मुलांना क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. त्याच अकादमीत छोटा राहुल देखील येऊ लागला.
भावासारखे व्हायचे होते वेगवान गोलंदाज परंतु बनला लेगस्पिनर
दीपक वेगवान गोलंदाजी करत, त्याच्या स्विंग चेंडूंचे उत्तर कोणाकडेच नसायचे. लवकरच दीपकची निवड राजस्थानच्या १५ वर्षाखालील संघात झाली. त्यावेळी आठ वर्षाचा असलेल्या राहुलला वाटले, आपणही वेगवान गोलंदाज व्हावे. मात्र, दीपक व दीपकचे वडील लोकेन्द्र यांनी त्याला लेगस्पिनर होण्याचा सल्ला दिला. राहुलने कोणतेही आढेवेढे न घेता लेगस्पिनर होण्याचे ठरवले. त्यानंतर, दीपक पुढच्या स्तरावर क्रिकेट खेळला आणि राहुलने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.
चौथीत सोडली शाळा आणि बनला क्रिकेटर
आधीपासूनच अभ्यासात इतका हुशार नसलेल्या राहुलने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लवकरच शाळेला रामराम ठोकला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, राहुल नियमितपणे फक्त चौथीपर्यंत शाळेत गेला आहे. आयुष्यातील या सर्वात मोठ्या निर्णयाला त्याच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला. शाळा सोडल्यानंतर राहुल दुपटीने मैदानावर घाम गाळू लागला. त्याच्या या मेहनतीचे फळ त्याला लवकरच मिळाले. २०१६-२०१७ च्या रणजी हंगामात त्याने राजस्थानकडून खेळताना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने विजय हजारे चषक देखील खेळला.
भाऊ-भाऊ खेळले एकाच संघाकडून आयपीएल
फेब्रुवारी २०१७ मध्ये आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्यावेळी दोन वर्षासाठी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने त्याला १० लाख रुपयात विकत घेतले. त्याचा मोठा भाऊ दीपक हादेखील त्याच संघाचा सदस्य होता. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यातून त्याने आपले आयपीएल पदार्पण केले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज असलेला हाशिम आमला त्याचा पहिला आयपीएल बळी ठरला. राहुलने त्या हंगामात ३ सामने खेळताना दोन बळी मिळवले होते.
आडनावामुळे फसली बीसीसीआयसुद्धा
दोन्ही चाहर बंधूंच्या बाबतीत एकदा बीसीसीआयने मोठी चूक केली होती. सन २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सराव सामन्यांसाठी बोर्ड इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली. या संघात दीपकला स्थान दिले गेले होते. मात्र, दीपक त्यावेळी दुखापतग्रस्त होता व त्याने तीन महिन्यांपासून कोणतेही क्रिकेट खेळलेले होते. त्यानंतर, बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले की, तो खेळाडू खरंतर राहुल चाहर आहे; नजरचुकीने ते दीपक चाहर झाले होते.
२०१८ एकोणीस वर्षाखालील संघात नाही मिळाले स्थान
राहुल सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत होता. सोबतच भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा नियमित सदस्य देखील तो बनलेला. २०१८ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात स्थान मिळेल अशी त्याला अपेक्षा होती; मात्र, राहुलला त्या विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्यानंतरही त्याने निराश न होता देशांतर्गत क्रिकेट गाजवणे सुरू ठेवले. यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी लक्षणीय राहिली.
आयपीएल लिलावात बनला करोडपती
विश्वचषकात संधी न मिळाल्याने त्याचे तितकेसे नुकसान झाले नाही. त्या विश्वचषका दरम्यानच २०१८ आयपीएलचा लिलाव झाला. राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्सने राहुलला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. २० लाख आधारभूत किंमत असलेल्या राहुलला अखेरीस, १ कोटी ९० लाख इतकी मोठी रक्कम मिळाली. या रकमेसह तो मुंबईच्या ताफ्यात सामील झाला. मयंक मार्कंडेने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने, राहुलला २०१८ आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीत राजस्थानचे ९ सामन्यात प्रतिनिधित्व करताना त्याने २० बळी आपल्या नावे केले. संपूर्ण स्पर्धेत तो सर्वाधिक बळी मिळवणारा खेळाडू होता.
२०१९ आयपीएलमध्ये केली कंजूस गोलंदाजी आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण
राहुलसाठी २०१९ आयपीएल हंगाम आपला ठसा उठवण्याची संधी देऊन गेला. राहुलने संपूर्ण स्पर्धेत अत्यंत कंजूस गोलंदाजी करत; ६.५५ च्या इकॉनॉमी रेटने १३ बळी आपल्या नावे केले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी तो जसप्रीत बुमराहनंतर सर्वाधिक विश्वासू गोलंदाज बनला होता. २०१९ आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याने चार षटके टाकताना अवघ्या चौदा धावा देत एक बळी आपल्या नावे केला. आयपीएलनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० सामन्यातून त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. हा सामना त्याचा आत्तापर्यंतचा एकमेव आंतरराष्ट्रीय सामना आहे. राहुलने २०१९ च्या अखेरीस आपली लहानपणापासूनची मैत्रीण इशानी हिच्यासमवेत अवघ्या विसाव्या वर्षी साखरपुडा उरकून घेतला.
२०२० आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयरथाचा सहसारथी
युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे. या संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून राहुलने जबाबदारी उचललेली आपल्याला दिसून येते. मुंबईच्या संघात कोणीही प्रसिद्ध फिरकीपटू नाही; मात्र, राहुलने याची उणीव संघाला भासू दिली नाही. राहुलने चालू हंगामात १५ सामने खेळताना १५ बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांच्यानंतर तो मुंबईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. गोलंदाजी व्यतिरिक्त राहुल एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून देखील प्रसिद्ध आहे. राहुलने अनेकदा दबावाच्या स्थितीत काही सुरेख झेल घेत, सामन्याची चित्र पालटलेले दिसून येते.
‘जायंट किलर’ राहुल चाहर
राहुलने आत्तापर्यंतच्या आपल्या आयपीएल कारकिर्दीत अनेक दिग्गज टी२० फलंदाजांना बाद करण्याची किमया केली आहे. त्यामुळे त्याला ‘जायंट किलर’ असेही म्हणतात. राहुलच्या खात्यात हाशिम आमला, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, विराट कोहली, बेन स्टोक्स, ब्रेंडन मॅक्यूलम या रथी-महारथींचे बळी आहेत. राहुलने आपला भाऊ दीपकला देखील बाद केले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी अगदी कमी वयात त्याने प्रमुख फिरकीपटू होण्याचा पल्ला गाठलेला दिसून येतो. मुंबई इंडियन्सचा संघ कायमच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जातो. राहुलने आपल्या खेळाने मुंबई संघ व्यवस्थापनाला भविष्यात आपण मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होऊ शकतो; असा विश्वास नक्कीच दिला आहे.
वाचा –
-एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’
-मुंबईसाठी आयपीएल जिंकलेला ‘तो’ आज मुंबईला हरवण्यासाठी उतरणार मैदानात