कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला एक वेगळीच अदब असते. वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने तर, कसोटीच्या एका डावात वैयक्तिक ४०० धावा करण्याचा विक्रम देखील केलेला आहे. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत विचार केला तर, फक्त दोनच खेळाडूंना त्रिशतकाची वेस ओलांडता आली आहे. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने ही कामगिरी दोनदा केलेली आहे. तर, करूण नायर या युवा फलंदाजाने एक त्रिशतक आपल्या नावे केले आहे.
भारताकडून कसोटीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावे आहे. त्याने द. आफ्रिकेविरुद्ध २००८ साली चेन्नई येथे ३१९ धावांची खेळी उभारली होती. सध्याच्या भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे सेहवागचा हा विक्रम मोडू शकतात.
आज अशाच ५ खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकतात.
५. पृथ्वी शॉ
युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा या यादीत समाविष्ट असलेला पहिला खेळाडू आहे. अवघ्या वीस वर्षाचा असलेला हा खेळाडू ‘भविष्यातील सेहवाग’ म्हणूनच ओळखला जातो. अनेक माजी खेळाडूंनी याला दुजोरा दिलेला आहे.
आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केलेल्या शॉने आपण भारतीय क्रिकेटचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहोत हे सिद्ध केले आहे. आक्रमकपणा व वेळप्रसंगी डाव सावरण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.
शॉने आत्तापर्यंत भारतासाठी चार कसोटी सामने खेळलेले आहेत यामध्ये त्याने ५५.८ च्या सरासरीने व ८६.३ अशा अफलातून स्ट्राईक रेटने ३५५ धावा काढलेल्या आहेत. घरगुती क्रिकेटमध्ये अवघ्या २२ सामन्यात ९ शतके त्याने जमवली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २०२ ही आहे.
४. रोहित शर्मा
भारतीय क्रिकेट संघाचा हिटमन रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून आपले नाव कमावले. रोहितने वनडेमध्ये ३ द्विशतके ठोकली आहेत. रोहितची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी पाहता २०१९ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी मालिकेत संघ व्यवस्थापनाने कसोटी क्रिकेटमध्येही रोहितला सलामीची संधी दिली.
कसोटी क्रिकेटमध्ये ही रोहितने आपली क्षमता सिद्ध करत दुहेरी शतक ठोकले. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या ३२ कसोटी सामन्यांमध्ये ४६.५४ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. यात त्याने ६ शतके १० अर्धशतके केली आहेत.
३३ वर्षीय रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सिद्ध केले आहे की, तो दीर्घकाळ क्रीजवर टिकून राहू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळाल्यास, आपल्या आक्रमक फलंदाजीने वीरेंद्र सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडणे त्याच्यासाठी फार अवघड जाणार नाही.
३. मयंक अगरवाल
या यादीत नाव असलेला तिसरा खेळाडू आहे मयंक अगरवाल. २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मयंकने भारतासाठी पदार्पण केले होते. पहिल्याच कसोटीत शानदार कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मयंक अगरवाल त्याच्या मोठ्या खेळ्यांसाठी ओळखला जातो. वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडू शकणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा नक्कीच समावेश होऊ शकतो.
मयंक अगरवालने आतापर्यंत भारतासाठी ११ कसोटी सामने खेळले आहेत. मयंकने ५७.२९ च्या जबरदस्त सरासरीने ९७४ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मयंकने अवघ्या अकरा सामन्यात दोन द्विशतके ठोकली आहेत. सलामीवीर असल्याने त्याच्याकडे सेहवागचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.
मयंक अगरवालनेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावले असून त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद ३०४ अशी आहे. ही खेळी मयंकने कर्नाटकसाठी २०१७-१८ रणजी करंडक दरम्यान महाराष्ट्राविरुध्द खेळली होती.
२. विराट कोहली
विक्रम मोडण्याची चर्चा आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव नसणे कसं शक्य होईल? विराट कोहलीदेखील अशा भारतीय खेळाडूंपैकी एक आहे जो आगामी काळात सेहवागच्या विक्रमाला नक्कीच गवसणी घालू शकेल.
२०१६-१७ च्या क्रिकेट हंगामात विराट कोहलीने चार दुहेरी शतके ठोकत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. कसोटी क्रिकेटमधील विराटची सर्वोत्तम धावसंख्या २५४ धावा असून कोहलीच्या नावावर एकूण सात दुहेरी शतके आहेत. विराट वेगाने धावा करू शकतो त्याचप्रमाणे कसोटीत खेळपट्टीवर वेळ देखील घालवू शकतो.
विराट कोहलीने आतापर्यंत देशासाठी ८६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ५३.६३ च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराट “रनमशीन” कोहलीच्या नावावर २७ शतके आणि २२ अर्धशतकांची नोंदही आहे.
१. चेतेश्वर पुजारा
या यादीतील अंतिम नाव चेतेश्वर पुजाराचे आहे. वीरेंद्र सेहवागचा येत्या काळात ३१९ धावांचा विक्रम मोडीत काढणारा खेळाडू चेतेश्वर पुजारा देखील असू शकतो. चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर टिकून राहण्यात पारंगत आहे. पुजाराला बाद करणे ही जगातील गोलंदाजासाठी एक जिकिरीचे काम असते.
चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत भारतीय संघाकडून ७७ कसोटी सामने खेळले आहेत आणि या दरम्यान त्याच्या बॅटमधून ४८.७० च्या जबरदस्त सरासरीने धावा ५८४० निघाल्या आहेत. पुजाराच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या ११४ डावांमध्ये १७ शतके आणि २५ अर्धशतके आहेत. मोठ्या मोठ्या खेळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजाराने कसोटीत तीन द्विशतकेही झळकावली आहेत.
३१ वर्षीय पुजाराने, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे ३५८ धावा. पुजाराचे वैशिष्ट्य म्हणजे तो अनेक सत्र एकाग्रतेने काढू शकतो. बऱ्याच जाणकारांच्या मते, पुजारा हा पारंपारिक कसोटी फलंदाजांमधील अखेरचा फलंदाज आहे. सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण पुजारामध्ये आहेत.
वाचनीय लेख –
वनडेत कधीही शुन्यावर बाद न होणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय
क्रिकेटबरोबर इतर खेळातही भारताचे नाव रोषण करणारे ३ महान क्रिकेटर
वनडे विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार