मोहाली| शुक्रवारपासून (०४ मार्च) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची (2 Matches Test Series) सुरुवात होणार आहे. हा सामना रोहित शर्मा याच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण हा सामना त्याचा कसोटी कर्णधार म्हणून कारकिर्दीतील पहिलाच सामना असेल. तर विराट कोहली याच्यासाठीही हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल. याखेरीज हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीनेही भारतीय संघासाठी महत्त्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यातील भारताची अंतिम एकादश (Team India Playing Xi) तगडी असेल.
भारतीय कसोटी संघाकडे सध्या गोलंदाजी फळी ठरलेली आहे. तसेच फलंदाजी फळीतील सलामीवीरही जवळपास निश्चित आहेत. परंतु अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. त्यामुळे मध्यक्रमात त्यांची जागा कोण (Pujara And Rahane Replacements) घेईल?, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
पुजारा आणि रहाणे यांना त्यांच्या मागील काही काळातील खराब प्रदर्शनामुळे संघाबाहेर केले गेले आहे. भरपूर संधी देऊनही हे शिलेदार चांगल्या लयीत परतू शकले नाहीत. मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी त्यांना चेतावणी देत कसोटी संघात सहभागी केले होते. परंतु तिथेही हे फलंदाज लौकिकास साजेशे प्रदर्शन करू शकले नाहीत. परिणामी त्यांना नारळ देण्यात आला आहे. यानंतर आता संघ निवडकर्ते पुजारा आणि रहाणेच्या चांगल्या पर्यायाच्या शोधात आहेत.
पुजारा भारताच्या कसोटी संघातून सहसा तिसऱ्या क्रमांकावर खेळत असे आणि ही जागा संघासाठी अतिशय महत्त्वाचीही आहे. त्यामुळे या क्रमांकावर युवा शुबमन गिल (Shubman Gill) याला आजमावले जाऊ शकते. शुबमनला १० कसोटी सामन्यांचा अनुभव असून त्याने आतापर्यंत ४ अर्धशतकेही केली आहेत. तसेच रहाणेची जागा घेणारा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) असू शकतो. अय्यरला केवळ २ सामन्यांचा अनुभव आहे. परंतु त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
हेही वाचा- रोहितने दिले रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाचे संकेत; म्हणाला…
अशात श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत मयंक अगरवाल सलामीला येऊ शकतो. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल. अष्टपैलू रविंद्र जडेजाला सातव्या आणि आर अश्विनला आठव्या क्रमांकावर पाठवले जाईल. यष्टीरक्षक रिषभ पंत नेहमीप्रमाणे त्याच्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितने दिले रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाचे संकेत; म्हणाला…
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू