भारत आणि इंग्लंड यांचा दरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी घेतली आहे. भारतीय फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. एखाद-दुसऱ्या फलंदाजाव्यतिरिक्त कोणालाही आपला प्रभाव पाडता आला नाही. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मागील सामन्यात अपयशी ठरलेला खेळाडू पुढील सामन्यात चमकदार कामगिरी करू शकतो.
पहिल्या कसोटी सामन्यात धावांसाठी झगडलेले फलंदाज दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करण्याची अपेक्षा आहे. दुसरा सामना ही चेन्नईच्याच मैदानावर होणार असल्याने, भारतीय फलंदाज या सामन्यात चाहत्यांची अपेक्षापूर्ती करू शकतात. तेव्हा, आज आपण अशा तीन भारतीय फलंदाजांविषयी जाणून घेऊया, जे दुसऱ्या कसोटीत शतक झळकावू शकतात.
१) शुबमन गिल
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केलेल्या गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही त्याने चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात २९ धावा केल्यानंतर त्याने दुसर्या डावात ५० धावांची खेळी साकारली. त्याचा फॉर्म असाच राहिला तर, तो दुसऱ्या कसोटीत आपल्या कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकतो.
२) चेतेश्वर पुजारा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावलेला पुजारा भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ७३ धावांची लाजवाब खेळी त्याने केली होती. मात्र, दुसऱ्या डावात तो अवघ्या १५ धावा करू शकला. चेन्नई येथील खेळपट्टी त्याच्या फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे, पुजारा दुसऱ्या सामन्यात शतक ठोकू शकतो.
३) विराट कोहली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. त्याच्या अनुपस्थितीत युवा भारतीय संघाने मालिका विजय साजरा केलेला. त्यानंतर विराटने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले. भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, विराटने दुसऱ्या डावात ७२ धावांची संघर्षपूर्ण खेळी खेळली होती. जवळपास मागील वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय शतक न ठोकू शकलेला विराट दुसऱ्या कसोटीत हा शतकांचा दुष्काळ संपवू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता