दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी (१२ जून) भारताला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात धूळ चारली. टी-२० मालिकेतील हा दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे दोन्ही संघाच्या फलंदाजांना जास्त धावा करता अल्या नाहीत. भारताने हा सामना गमावला असला, तरी दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने मात्र या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले आणि चार विकेट्स नावावर केल्या.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.२ षटकात हे लक्ष्य गाठले. टी-२० मालिकेतील हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. भारताला आता मालिका जिंकण्यासाठी पुढचे सलग तीन सामने जिंकावे लागतील. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये अवघ्या १३ धावा खर्च केल्या आणि ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा भुवनेश्वरने टी-२० आंतरराष्ट्रीयमधील एखाद्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट्स घेणाची कामगिरी जास्त गोलंदाज करू शकले नाहीत. आतापर्यंतच्या टी-२० च्या इतिहासात भारताचे फक्त ८ असे खेळाडू झाले आहेत, ज्यांनी एखाद्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या असतील. त्यातही भुवनेश्वर एकटाच असा आहे, ज्याने ही कामगिरी ३ वेळा केली आहे. इतर सर्वांनी प्रत्येकी एक-एक वेळा ही कामगिरी केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज
३ वेळा – भुवनेश्वर कुमार
१ वेळा – दीपक चाहर
१ वेळा – अशोक डिंडा
१ वेळा – जहीर खान
१ वेळा – हार्दिक पंड्या
१ वेळा – आरपी सिंग
१ वेळा – बरिंदर सराण
१ वेळा – शार्दुल ठाकुर
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वात मोठी ४० धावांची खेळी केली. तर आफ्रिकी संघासाठी त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने ४६ चेंडूत ताबडतोब ८१ धावा फटकावल्या. भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्यानंतर आफ्रिकी संघ कोलमडला होता, पण क्लासेनने त्यांचा डाव सांभाळला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताने सामना गमावला, पण भुवनेश्वरला ४ विकेट्सने मोठा फायदा, महत्वाच्या यादीत अश्विनला टाकले मागे
नुकसान झालं गड्या! इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे पब जळून खाक, आर्थिक नुकसानीवर क्रिकेटर भावूक






