भारतीय क्रिकेट संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) पार पडणार आहे. ही स्पर्धा संपताच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच 5 सामन्यांची टी20 मालिकाही खेळायची आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या मालिकेसाठी भारताचा धडाकेबाज फलंदाज कर्णधारपदाची भूमिका निभावताना दिसू शकतो. वृत्तांनुसार, या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा याच्यासह अनेक प्रमुख भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशात कोण आहे तो खेळाडू, जो भारताचे नेतृत्व करू शकतो, त्याच्याविषयी जाणून घेऊयात.
हार्दिकच्या अनुपस्थितीत ‘हा’ करणार नेतृत्व!
आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आपल्या घोट्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका खेळू शकणार नाही. अशात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला भारतीय संघाचा कर्णधार (Team India Captain) बनवले जाऊ शकते. खरं तर, रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय उपकर्णधार हार्दिक संघाचे नेतृत्व करतो. विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी प्रमुख भारतीय खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
https://twitter.com/ImAshuSingh09/status/1725473432715034866
आंतरराष्ट्रीय स्तरावर सूर्याने केले नाही नेतृत्व
सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याच्यावर उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा कर्णधारपद भूषवले आहे. आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीत त्याने आतापर्यंत 53 सामन्यात 46.02च्या सरासरीने आणि 172.70च्या स्ट्राईक रेटने 1841 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी20 मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरम येथे आणि तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत खेळला जाईल. पुढील महिन्यात 1 डिसेंबरला स्पर्धेचा चौथा सामना नागपूरमध्ये पार पडेल. तसेच, अखेरचा सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू विश्वचषकात भारतीय संघाचा भाग आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही हार्दिक बाहेर!
विश्वचषक 2023 स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध 18 ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो पुढील सामना खेळू शकला नव्हता. असे म्हटले जात आहे की, हार्दिक पुढील महिन्यात म्हणजेच 10 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या 3 टी20 सामन्यांची मालिका आणि 17 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेपर्यंत फिट होऊ शकणार नाही. (this player can captain india in t20 series against australia report)
हेही वाचा-
पाकिस्तानी फलंदाज मोडणार विराटचा मोठा विक्रम, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने व्हाल आश्चर्यचकित
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार अश्विन! माजी दिग्गजाकडून मिळाले संकेत