मुले मोठी झाली, तरी आई वडिलांसाठी ती नेहमीच लहान असतात. तसेच आई वडील लांब जरी असले, तरी त्यांचे मुलांवरील प्रेम काही केल्या कमी होत नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. रविवारी (20 नोव्हेंबर) सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध शतक केल्यानंतर देखील असेच काहीसे चित्र चाहत्यांना पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवच्या बहिणीने इंस्टाग्राम स्टोरीला हा व्हिडिओ शेअर केला होता, जो चांगलाच व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही महिन्यांमध्ये भारतासाठी सर्वात महत्वाचा फलंदाज ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात देखील त्याने संघासाठी असेच जबरदस्त प्रदर्शन केले, पण संघाला विजेतेपद मात्र मिळवून देऊ शकला नाही. विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सने मोठा पराभव मिळाला. सध्या संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला, पण दुसऱ्या सामन्यात मात्र सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 111 धावा कुटल्या. भारताने हा सामना 65 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला. विजयात सूर्यकुमारचे योगदान मोलाचे ठरले.
सूर्यकुमाने या सामन्यात केलेले शतक त्याचे कुटुंबीय घरी टीव्हीवर पाहत होते. सूर्यकुमार जेव्हा शतकाचा जल्लोष करत होता, तेव्हा त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला. टीव्हीच्या स्क्रीनवर सूर्यकुमारचा चेहरा पाहून त्याची आई स्वतःला रोखू शकली नाही, असेच या व्हिडिओतून दिसते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. व्हिडिओतून सूर्यकुमारचे कुटुंब अगदीच सर्वसामान्य असल्याचे वाटते, असे चाहते बोलत आहेत.
https://twitter.com/binu02476472/status/1594934229422727168?s=20&t=LciWslkj6oOr2z0XtCSG4w
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताच्या 6 फलंदाजांनी विकेट्स गमावल्या 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड 18.5 षटकांमध्ये 126 धावा करून सर्वबाद झाला. भारताच्या विजयात सूर्यकुमारप्रमाणेच दीपक हुड्डाचे योगदान देखील महत्वाचे राहिले. हुड्डाने टाकलेल्या 2.5 षटकांमध्ये 10 धावा देत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी नेपियरमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार नवी सुरुवात! आणणार क्रिकेटचे आणखी छोटे प्रारूप
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश