भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. तर दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. जिथे त्यांना ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १७ ते २१ डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे. तर दुसरा सामना २६ ते ३० डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे. तसेच तिसरा सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे.
या मालिकेत न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विश्रांती दिलेल्या खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे. चला तर जाणून घेऊया, कोण आहेत ते ३ खेळाडू?
१) हनुमा विहारी – या यादीत सर्वोच्च स्थानी आहे तो भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज हनुमा विहारी. त्याच्याकडे कसोटी क्रिकेट खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला संघात स्थान दिले जात आहे. परंतु प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान मिळवण्यास तो अपयशी ठरत आहे. त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील स्थान देण्यात आले नाहीये. तो सध्या भारतीय अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. तसेच त्याची सध्याची कामगिरी पाहता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी दिली गेली पाहिजे.
२) जयदेव उनादकट – या यादीत दुसरे नाव जयदेव उनादकटचे आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा जास्त अनुभव नाहीये. परंतु गेल्या ९ वर्षांपासून तो संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी केली आहे. त्याला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांनतर तो संघातून बाहेर आहे आणि निवडकर्ते देखील त्याला दुर्लक्ष करत आहेत. त्याने १० वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते.
त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ८९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३२७ गडी बाद करण्यात यश आले आहे. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट २.९४ चा राहिला आहे. ही कामगिरी पाहता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी दिली गेली पाहिजे.
३) केएस भरत – या यादीत तिसऱ्या स्थानी आहे, भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत. हा तोच खेळाडू आहे, जो आयपीएल २०२१ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून चर्चेत आला आहे. कानपूरच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या पहिल्या सामन्यात वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाल्यानंतर केएस भरतने यष्टिरक्षण केले होते. त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. परंतु त्याला अजुनपर्यंत पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ७८ सामन्यांमध्ये ३७.२४ च्या सरासरीने ४२८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ शतक आणि २३ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच यादरम्यान ३०८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत स्थान दिले गेले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या आर्ध्या तासात पंचांनी सतत सूर्यप्रकाशाचा आढावा घेणे योग्य होते का? रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
राहुल तेवतिया अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली ‘ही’ क्रिकेटर मंडळी