मुंबई । आयपीएलच्या तेराव्या सामन्यात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे काहीच चालले नाही. त्याचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे लयीत दिसले नाहीत. मुंबई इंडियन्सला किंग्ज इलेव्हन पंजाब मागील सामन्यांप्रमाणे झुंज देईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही आणि अबूधाबीमध्ये त्यांना 48 धावांनी पराभव पत्करावा लागला.
केएल राहुलच्या तुलनेत रोहित शर्मा अनुभवी कर्णधार वाटत होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने हा दुसरा विजय मिळवला आहे. मागील सामन्यात त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांनी प्रत्येक चूक सुधारली आणि विजय मिळविला. तथापि, किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सामन्यात काही चुका झाल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूया.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पराभवाची 3 कारणे
1. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेल्या संघांना या आयपीएलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याचे, मागील काही सामन्यांमध्ये दिसून आले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला दबाव नसतो आणि खेळाडू मोकळेपणाने खेळू शकतात. याखेरीज आता युएईच्या खेळपट्ट्या नंतर धीम्या होत राहतात. अशा परिस्थितीत नंतर फलंदाजी करणे कठीण होते. दव जरी पडत राहिले, तरी त्याचा तेथे फारसा परिणाम होत नाही.
2. शेवटच्या षटकात 25 धावा
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अंतिम षटक कृष्णप्पा गॉथमने टाकले. मुंबई इंडियन्सचे फलंदाज कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी त्याची गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी केली. पोलार्डने सलग तीन षटकार लगावले. त्याच्याव्यतिरिक्त पंड्यानेही षटकार ठोकला. मुंबईने अंतिम षटकात एकूण 25 धावा केल्या आणि धावसंख्या 191 पर्यंत नेली. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी हे षटक भारी ठरले. जेम्स नीशमनेही चार षटकांत 50 पेक्षा जास्त धावा दिल्या. परिणामी संघाचा पराभव झाला.
3. खराब फलंदाजी
केएल राहुल आणि मयंक अगरवाल दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, पण यावेळी त्यांनी चांगली फलंदाजी केली नाही. सुरुवात चांगली करून दिली असली तरीही, नंतर दोघेही बाद झाले. यानंतर किंग्ज इलेव्हनचा एकही फलंदाज क्रीजवर टिकला नाही. निकोलस पुरनने सर्वाधिक 44 धावा फटकावल्या. फलंदाजांची सुमार कामगिरी पंजाबच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.