भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला होता. कडक बायो बबलचे पालन करूनही या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बायो बबलचा फुगा फुटला. सोमवारी (३ मे) कोलकता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली होती. त्यानंतर मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने मिळून आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयपीएल हंगामात असे काही संघ आहेत, ज्यांना आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे मोठा फायदा झाला आहे.
१) सनरायझर्स हैदराबाद : आयपीएल २०२१ स्पर्धेत डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. सुरुवातीच्या ६ सामन्यात डेविड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले होते. परंतु त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश येत होते.
त्यामुळे ७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या संघव्यावस्थापकांनी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याऐवजी केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला प्लेइंग ११ मध्ये देखील स्थान देण्यात आले नव्हते. हा सामनाही हैदराबादने गमावला होता. सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत २ गुणांसह तळाशी होता.
२) पंजाब किंग्ज : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत, राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार केएल राहुलला या हंगामातील शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले होते. त्याच्याऐवजी मयंक अगरवालने संघाचे नेतृत्व केले होते.
पंजाब किंग्ज संघाने या हंगामात एकूण ८ सामने खेळले आहेत. यात त्यांना अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे पंजाब किंग्ज संघाला इतके दुःख नसेल झाले.
३) राजस्थान रॉयल्स : या संघात कित्येक अनुभवी खेळाडू असताना देखील राजस्थान रॉयल्स संघाने युवा संजू सॅमसनला संघाची जबाबदारी दिली होती. त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले होते. तरीदेखील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात ७ सामने खेळले. यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याची बातमी ऐकून राजस्थान रॉयल्स संघाने सुटकेचा श्वास सोडला असेल.
हे तिन्ही संघ पुन्हा आयपीएल २०२१ चा हंगाम सुरू झाल्यास जोरदार पुनरागमन करण्यासाठी झगडताना दिसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सिक्सर किंग! आयपीएल २०२१मध्ये खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारे शिलेदार, अव्वलस्थानी आहे ‘हा’ भारतीय
आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा






