‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात ‘आयपीएल’ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात भारतात आयोजित केलेली ही स्पर्धा करोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र बीसीसीआयने ह्या संकटातही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचं जैव सुरक्षित वातावरणात यशस्वी आयोजन करून दाखवलं.
आयपीएलचा हा तेरावा हंगाम अनेक कारणांनी गाजला. बर्याच युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सगळ्यांना प्रभावित केलं तर काही ज्येष्ठ खेळाडूंनी सातत्य राखत कामगिरी उंचावली. मात्र ह्या आयपीएलनंतर चर्चा झाली, ती ३ आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या अपयशाची.
टी-२० प्रकारात कर्णधार अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतो. क्रिकेटच्या ह्या वेगवान प्रकारात झटपट निर्णय घेऊन संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी कर्णधाराच्या खांद्यावर असते. आयपीएलच्या इतिहासात ही जबाबदारी यशस्वीपणे निभावणारे कर्णधार म्हणून रोहित शर्मा, एमएस धोनी ह्यांची नावं घेतली जातात.
मात्र काही कर्णधार असेही आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव असूनही आयपीएलमध्ये मात्र त्यांच्या संघाला बाद फेरी पर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरले. ह्या लेखात अशाच तीन कर्णधारांबाबत सांगणार आहोत, ज्यांच आयपीएलमधील कर्णधारपद धोक्यात आहे.
१) विराट कोहली –
विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे. २०१३ पासून तो कर्णधार पदाची कमान सांभाळत आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत बंगलोर अजून एकही विजेतेपद पटकावू शकले नाही आहे. २०१६ साली अंतिम सामन्यापर्यंत मजल, ही विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ह्या आठ वर्षांत अनेक दिग्गज खेळाडू बंगलोरच्या संघाकडून खेळले, अनेक प्रकारचे संघबांधणीचे प्रयोगही आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने करून पाहिले. मात्र, त्यांना करंडक उंचावण्यात यश आले नाही. त्यामुळे विराटच्या नेतृत्वावर चहूबाजूने टीका होत असून त्याने युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवून आपल्या वैयक्तिक खेळाकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे पुढील हंगामात आरसीबीचे संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
२) ऑयन मॉर्गन –
आयपीएल २०२० च्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्स संघाचं कर्णधारपद दिनेश कार्तिककडे होतं. मात्र ८ सामन्यानंतर संघाची गाडी रूळावर येत असतानाच त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक कामगिरीचं कारण देत त्याने कर्णधारपद सोडलं असलं तरी स्पर्धेच्या मध्यातच हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ऑयन मॉर्गनकडे केकेआरच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
त्याला संघबांधणीसाठी वेळ कमी मिळाला असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली ६ सामन्यात संघाला फक्त ३ विजय मिळाले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. त्यामुळे कोलकाता संघाने परदेशी खेळाडूला कर्णधार करण्यापेक्षा भारतीय युवा खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची गरज आहे. माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेसुद्धा शुबमन गिलला कर्णधार करण्याचा सल्ला कोलकाताच्या संघ व्यवस्थापनाला दिला आहे.
३) स्टीव स्मिथ –
स्टीव स्मिथ गेल्या २ हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाचाही अनुभव आहे. मात्र, तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून फारसा यशस्वी ठरला नाही आहे. या हंगामात तर कर्णधार म्हणून त्याने घेतलेले निर्णय अनाकलनीय होते. तसेच फलंदाज म्हणून त्याची कामगिरी असमाधानकारक होती.
मात्र परदेशी कर्णधार असल्याने डेव्हिड मिलर, टॉम करन ह्या गुणवान परदेशी खेळाडूंनाही संघाबाहेर बसावे लागले. त्यामुळे स्टीव स्मिथचे कर्णधारपद काढून घेण्याचा विचार संघ मालक आणि संघ व्यवस्थापन करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७६ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाली लंका प्रीमियर लीगमध्ये संधी
“चेन्नई सुपर किंग्जने सर्व खेळाडूंना संघातून मुक्त करावे”, दिग्गजाचे खळबळजनक विधान
विराटविरुद्ध ‘हा’ खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शस्त्र