---Advertisement---

टीम पेन या गोष्टीसाठी मागणार विराट कोहलीची परवानगी

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2019 6:04 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। रविवारी ऑस्ट्रेलियाने द गॅबा स्टेडियम येथे पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन(Tim Paine) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.

यावेळी पेन म्हणाला की पुढीलवर्षी भारताबरोबर होणाऱ्या कसोटी मालिकेची सुरुवात ब्रिस्बेनपासून(Brisbane) करण्यासाठी तो भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) परवानगी घेईल तसेच तो म्हणाला, आम्ही प्रयत्न करु की भारतीय संघ इथे दिवस-रात्र कसोटीही खेळेल.

भारताने मागीलवर्षी ऍडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिवस-रात्र कसोटी(Day-Night Test) सामना खेळण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर भारताने नुकताच बांगलादेश विरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे.

तसेच ऑस्ट्रेलियन संघ सहसा ब्रिस्बेनच्या मैदानावर मायदेशातील कसोटी मालिकेची सुरुवात करतो. पण भारत विरुद्ध झालेल्या मागील कसोटी मालिकेतील एकही सामना ब्रिस्बेन येथे खेळला गेला नव्हता.

डिसेंबर 2018 – जानेवारी 2019 दरम्यान झालेले ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचे कसोटी सामने मेलबर्न, सिडनी, ऍडलेड आणि पर्थच्या मैदानावर खेळण्यात आले होते. पण आता भारतीय संघ पुन्हा पुढीलवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुढच्या वर्षी ब्रिस्बेनमध्ये भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार का, असे एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर पेन म्हणाला, ‘आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आम्हाला यासाठी विराटच्या मागे धावावे लागेल. मला खात्री आहे की त्याच्याकडून आम्हाला एका टप्प्यावर उत्तर मिळेल.’

‘आम्हाला आमचा मायदेशातील मोसम तिथे(ब्रिस्बेन) सुरु करायला आवडतो आणि आम्ही बऱ्याच काळापासून ते करत आलो आहोत. याला फक्त अपवाद मागचा मोसम होता.’

तसेच पेन पुढे म्हणाला, ‘मी म्हटल्याप्रमाणे आम्ही विराटला विचारू आणि इथे(ब्रिस्बेन) खेळण्याची परवानगी मिळू शकेल का ते पाहू. कदाचित तो चांगल्या मूडमध्ये असेल तर दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळू.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---