भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवारी (४ मार्च) मोहालीमध्ये खेळला जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे आणि याच कारणास्तव याला महत्त्व प्राप्त झाले आहे. २०११ मध्ये कसोटी कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर विराट दिवसेंदिवस स्वतःचा खेळ सुधारत गेला आणि महान फलंदाजांमध्ये सहभागी झाला. चला तर विराटच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
पदार्पणाच्या कसोटी मालिकेत ठरला होता अपयशी
भारतीय संघाने २०११ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यानंतर संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सचिन तेंडुलकरला विश्रांती दिली गेली होती आणि त्याच्या जागी विराट कोहलीला कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली. वेस्ट इंडीजमध्ये पदार्पणाच्या कसोटी मालिकेत विराट काही खास कामगिरी करू शकला नाही. मालिकेतील तीन सामन्यांमध्ये त्याने ७६ धावा केल्या होत्या.
फिनिशरच्या रुपात केली चांगली कामगिरी
त्यानंतर २०११ मध्ये वेस्ट इंडीज संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराटला संधी मिळाली होती आणि यावेळी त्याने संधीचा योग्य फायदा घेतला. तिसऱ्या सामन्यात ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करताला विरटाने पहिल्या डावात ५२, तर दुसऱ्या डावात ६३ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियामध्ये केले पहिले कसोटी शतक
भारतीय संघ २०१२ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसत होते. तसेच विराट चांगली सुरुवात मिळाल्यानंतर विकेट गमावत होता. परंतु, एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात विराटने अप्रतिम शतक केले. त्याने ११६ धावांची तुफानी खेळी केली. विराटने महत्वाची खेळी केली असली, तरी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका भारताने ०-४ ने गमावली होती.
२०१४ चा इंग्लंड दौरा होता खूपच निराशाजनक
कसोटी पदार्पणानंतर तीन वर्षातच विराटने विदेशात अनेकदा चांगली खेळी केली आणि यासाठी त्याचे कौतुकही झाले. पण २०१४ सालचा इंग्लंड दौरा त्याच्यासाठी खूपच खराब ठरला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने अवघ्या १३४ धावा केल्या. या दौऱ्यात विराटला स्विंग चेंडूमुळे अधिक त्रास झाल्याचे पाहायला मिळाले. एका मुलाखतीत विराटने मान्य केले होते की, त्या दौऱ्यानंतर त्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केले आणि कर्णधारही बनला
त्यानंतर २०१४ मध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात विराटवर सर्वांचेच लक्ष लागले होते. एडिलेडमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये त्याने शतकी खेळी केली. याच दौऱ्यात धोनी कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि विराटनंतर कर्णधार बनला. या दौऱ्यात विराटने एकूण ४ शतके केली आणि ६९२ धावा केल्या.
इंग्लंडमध्ये शतक करून केली टिककारांची बोलती बंद
विराट २०१८ पर्यंत जागतिक क्रिकेटमधले खूप मोठे नाव बनला होता. अशात २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यात इंग्लिश खेळाडूंपुढे त्याला चांगले प्रदर्शन करून दाखवणे गरजेचे होते. विराटने या दौऱ्यात संघाचे नेतृत्व आणि स्वतःची फलंदाजी या दोन्ही गोष्टींमुळे टीकाकारांना चोख उत्तर दिले होते. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत विराटने २ शतके आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ५९३ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियात भारताने जिंकली पहिली कसोटी मालिका
विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा कसोटी मालिकेत त्यांच्या धरतीवर पराभूत केले. २०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेत विराटने शतकही केली होते. भारताने या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले होते आणि ही घटना ऐतिहासिक ठरली होती. यानंतर विराट जगातील महान कर्णधारांमध्ये गणला जाऊ लागला
विराट कोहलीची कारकिर्द
दरम्यान विराटच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १०० कसोटीपूर्वी खेळलेल्या ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ६८ कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी ४० सामन्यात विजय मिळवला. उरलेल्या १४ सामन्यात संघ पराभूत झाला, तर ११ सामने अनिर्णीत राहिले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावार २७ शतके, तर २८ अर्धशतके आहेत.
महत्वाच्या बातम्या –
रोहित वयाच्या ३४ व्या वर्षी बनला कसोटी कर्णधार, या विक्रमात कुंबळेनंतर दुसरा क्रमांक
विराटची १०० वी कसोटी: ‘रनमशीन’ कोहलीच्या नावावर आहेत ‘हे’ १० मोठे विक्रम