यंदाच्या वर्षी भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचे फळ देखील मिळाले आहे, ते म्हणजे भारताने ७ पदके जिंकली आहे. भारताने यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज चोप्राने शनिवारी इतिहास रचत देशाला ऍथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशासह भारतासाठी या ऑलिम्पिकची सांगता सुवर्णमयी झाली. या लेखातून आपण यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी भारताला पदके मिळवून दिली त्यांचा आढावा घेऊ.
१) नीरज चोप्रा – सुवर्ण पदक
नीरज चोप्राने शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. देशासाठी वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहे. नीरजने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरवर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचबरोबर त्याने या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले आहे.
२) मीराबाई चानू – रौप्य पदक
भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीला रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. चानूने हे यश ४९ किलो वजनी गटात हे यश मिळवले. तिने क्लिन अँड जर्कमध्ये ११५ किलो आणि स्नॅचमध्ये ८७ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलून पदक मिळवले आहे.
३) रवी दहिया – रौप्य पदक
कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याच्या यशामुळे त्याने भारताच्या खात्यात दुसरे रौप्य पदक आले. देशाला त्याच्याकडून सुवर्ण पदकाची आशा होत्या, पण तो अंतिम सामना जिंकू शकला नाही.
४) पीव्ही सिंधू – कांस्य पदक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने भारतासाठी कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर तिने हे पदक जिंकले आहे.
५) लवलिना बोर्गोहेन – कांस्य पदक
बॉक्सिंगमध्ये भारताच्या लवलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. तिने सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण उपांत्य फेरीत तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असूनही तिने भारतासाठी कांस्य पदक जिंकले आहे.
६) बजरंग पुनिया – कांस्य पदक
कुस्तीपटू बजरंग पुनियाने शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीप यश मिळवले आहे. त्याने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. बजरंगने या ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे कांस्य आणि एकूण सहावे पदक मिळवून दिले. या सामन्यात बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत निबेकोव्हचा पराभव करून हे पदक जिंकले आहे.
७) भारतीय पुरुष हॉकी संघ – कांस्य पदक
भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला पराभूत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कांस्यपदक देखील पटकावले आहे. भारताने ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पदक जिंकले आहे. यापूर्वी, भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये वासुदेवन भास्करनच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या ३ वर्षात एकही ग्रँड जिंकले नसले, तरी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडरर ठरतोय भल्याभल्यांना भारी
नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट संघाने केली ‘ही’ गोष्ट; ‘बुम बुम बुमराह’चे वक्तव्य