क्रिकेट स्पर्धेत विविध कालांतराने विविध बदल होत गेले. कसोटी क्रिकेट पासून सुरु झालेला क्रिकेटचा प्रवास, वनडे क्रिकेट आणि आता टी-२० क्रिकेट पर्यंत आला आहे. या २०-२० षटकांच्या क्रिकेटने सर्व चाहत्यांना आपलंस केलं आहे. आज एकापेक्षा एक महान खेळाडू या टी-२० क्रिकेट प्रकारात खेळताना दिसतात.
टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. या टी२० क्रिकेटमध्ये बरेच दिग्गज फलंदाज आहेत, ज्यांनी भरपूर धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेलने ४०४ सामन्यात १३२९६ धावा केल्या आहेत. त्यानंतर, कायरन पोलार्ड ५१७ सामन्यात १०३७० धावा करून दुसर्या स्थानावर आहे. तसेच आत्तापर्यंत ३ भारतीय क्रिकेटपटूंनी टी२० क्रिकेट प्रकारात ८ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आज या लेखात याच ३ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.
टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार करणारे ३ भारतीय दिग्गज
३. सुरेश रैना –
टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने २००६ मध्ये पदार्पण करत पहिला सामना दक्षिण आफ्रिका सोबत जोहान्सबर्ग येथे खेळला. या सामन्यात भारतीय संघासोबतच ११ भारतीय खेळाडूंनीही टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यात रैनाचाही समावेश होता. हा पदार्पण सामना भारताने जिंकला.
टी-२० क्रिकेटमध्ये रैनाने आत्तापर्यंत ३१९ सामान्यांच्या ३०३ डावांमध्ये ८३९२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ५१ अर्धशतके आणि ४ शतके देखील ठोकली आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १२६ अशी आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रैना आता आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तसेच त्याने यूएईमध्ये चालू असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातूनही माघार घेतली आहे. ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने आयपीएल स्पर्धेतली आपली छाप सोडली आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे.
२. रोहित शर्मा –
भारतीय वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षात त्याच्या दमदार खेळीने वेगळीच छाप उमटवली आहे. २००७ ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण करणारा रोहित आज एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो.
‘हिटमॅन’ रोहित शर्माने २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण केले. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ३३४ सामान्यांच्या ३२१ डावांमध्ये ८८५३ धावा केल्या आहेत. आत त्याच्या ६२ अर्धशतकांचा आणि ६ शतकांचा समावेश आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय आहे.
त्याची आयपीएलमध्ये ही जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
१. विराट कोहली –
सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने झिंबाब्वे विरुद्ध २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २६ धावांची महत्वपूर्ण खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले होते. टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत २८६ सामान्यांच्या २७१ डावांमध्ये ९०३३ धावा केल्या आहेत. यात ६५ अर्धशतके आणि ५ शतके ठोकली आहेत.
त्याने नुकतेच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना टी२०मध्ये ९००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. तो टी२०मध्ये ९००० धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा जगातील सातवा फलंदाज ठरला
विराटने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे २००८ पासून प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे.