इंडियन प्रीमियर लीगमध्ये षटकार-चौकारांचा वर्षाव पाहायला न मिळणे म्हणजे पूर्व दिशेऐवजी पश्चिमेला सूर्य उगवण्यासारखे आहे. अर्थातच आयपीएल म्हटले की फलंदाजांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच.
संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल २०२०पुर्वी असे म्हटले जात होते की, तेथील मैदाने आकाराने मोठी आहेत. त्यामुळे फार क्वचित षटकार किंवा चौकार पाहायला मिळतील. परंतु, आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच विस्फोटक फलंदाजांनी ही गोष्ट खोटी ठरवली. ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलपासून ते नवख्या प्रियम गर्गपर्यंत सर्वांनी षटकार-चौकारांची रांग लावली. कित्येक फलंदाजांच्या षटकाराचे चेंडू गोळा करण्यासाठी युएईतील चाहते मैदानाबाहेर गर्दी करतानाची दृश्येही पाहायला मिळाली.
या लेखात आम्ही, आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप-५ फलंदाजांची माहिती दिली आहे.
आयपीएलच्या १३व्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
१) इशान किशन –
आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने पूर्ण हंगामात १४ सामने खेळले असून १४५.७६च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ३० षटकार लगावले आहेत. तसेच तो या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला आहे.
२) संजू सॅमसन –
२५ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू खेळाडू संजू सॅमसन हा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा आधार बनला आहे. आयपीएल २०२०मध्ये त्याने मारलेले कित्येक चेंडू स्टेडियमबाहेर गेल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या जोरदार फटकेबाजीने विरुद्ध संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेणारा सॅमसन या हंगामात सर्वाधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने राजस्थानकडून १४ सामने खेळले असून २६ षटकार मारले आहेत.
३) हार्दिक पंड्या –
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याला एकाहून एक खरतनाक षटकार मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. त्यामुळे सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचे नाव नसणे, ही आर्श्चयाची बाब ठरेल. आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक लागतो. पंड्याने आतापर्यंत मुंबईकडून १४ सामने खेळले असून २५ षटकार ठोकले आहेत.
४) निकोलस पूरन –
किंग्स इलेव्हन पंजाबचा डावखुरा फलंदाज निकोलस पूरन याने यावर्षी कित्येक सामन्यात संघाला हारते सामने जिंकून दिले आहेत. गतवर्षी तो आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करु शकला नाही. परंतु यावेळी मिळालेल्या संधीला न दवडता त्याने ३०० धावांचा आकडा पार केला. या हंगामात त्याने १४ सामने खेळले असून ३५.३०च्या सरासरीने ३५३ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २५ षटकारांची खात्यात नोंद केली आहे.
५) इयॉन मॉर्गन –
साखळी फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या इयॉन मॉर्गनचाही या यादीत समावेश होतो. मॉर्गनने या हंगामातील १४ सामन्यात २४ षटकार मारले आहेत. यासह त्याने सिक्सर किंग ख्रिस गेललाही मागे टाकत पाचवा क्रमांक पटकावला आहे. गेल या यादीत त्याच्या २३ षटकारांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग लेख-
…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL: रोहित, धवन, पोलार्ड यांच्याकडे असेल कीर्तिमान स्थापन्याची संधी; पाहा काय आहे खास आकडेवारी
जर आयपीएलचा अंतिम सामना टाय झाला तर…
भारतात ‘या’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहता येणार न्यूझीलंडचे क्रिकेट सामने