२००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये(आयपीएल) आत्तापर्यंत अनेक खेळाडू खेळले. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे.
अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये मोठ-मोठ्या खेळीही केल्या आहेत. या १२ वर्षात अनेक फलंदाजांनी त्यांच्या खेळीने एक वेगळी छाप पाडली. काही खेळी तर अशा होत्या ज्या कायमच्या क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत राहिल्या. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १०० हून अधिक खेळाडूंनी किमान एकतरी अर्धशतक केले आहे. त्यातील सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या ५ फलंदाजांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज –
५. रोहित शर्मा – ३७ वेळा (१ शतक आणि ३६ अर्धशतके)
भारतीय संघातील धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख खेळाडूच नाही तर आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधारही आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो मुंबई इंडियन्स संघात येण्यापूर्वी डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८८ सामने खेळले असून यामध्ये ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतकाचा आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे तो ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा सर्वाधिकवेळा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमाकंवर आहे. त्याने ३७ वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे.
४. शिखर धवन – ३७ वेळा (३७ अर्धशतके)
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. याआधी तो सनरायझर्स हैद्राबाद, डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स अशा संघाकडूनही खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५९ सामने खेळले असून यात ३३.४२ च्या सरासरीने ४५८९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३७ अर्धशतकांचाही समावेश आहे. मात्र त्याला आयपीएलमध्ये अजून एकदाही शतक करता आलेले नाही. त्यामुळे तो ३७ अर्धशतकांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
३. सुरेश रैना – ३९ वेळा (१ शतक आणि ३८ अर्धशतके)
‘मिस्टर आयपीएल’ अशी ओळख असलेला सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स संघातील महत्त्वाचा भाग आहे. तो आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. याला अपवाद केवळ २०१६ आणि २०१७ चा मोसम राहिला आहे. या दोन मोसमात चेन्नई सुपर किंग्सवर बंदी असल्याने तो गुजरात लायन्सकडून खेळला. त्याने आत्तापर्यंत १९३ आयपीएल सामने खेळले असून यात त्याने ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२. विराट कोहली – ४१ वेळा (५ शतक आणि ३६ अर्धशतके)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही नेतृत्व करतो. विशेष म्हणजे तो आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग राहिला आहे. तो आयपीएलमध्ये सध्या सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १७७ सामन्यात ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४१ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यात त्याच्या तब्बल ५ शतकांचा आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१. डेव्हिड वॉर्नर – ४८ वेळा (४ शतक आणि ४४ अर्धशतके)
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२०मध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादच्या आधी दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १२६ सामने खेळले असून ४३.१७ च्या सरासरीने ४७०८ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ४८ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची केळी केली आहे. यात त्याच्या ४ शतकांचा आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे तो या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग लेख –
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…
-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी