भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती घोषित केली आहे. 3 ऑक्टोबर 2000 ला केनिया विरुद्ध वनडे सामन्यातून युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
विशेष म्हणजे युवराजच्या आधी म्हणजेच 2000 किंवा 2000पुर्वी पदार्पण केलेले अजून 4 खेळाडू आहेत ज्यांनी अजूनही निवृत्ती घेतली नाही.
यात सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण हे हरभजन सिंगचे झाले आहे. हरभजन सिंगचे पदार्पण 25 मार्च 1998 रोजी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध कसोटी सामन्यातून झाले आहे. त्याने 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
पण त्याला मार्च 2016 नंतर राष्ट्रीय संघात कोणत्याच प्रकारात स्थान देण्यात आले नाही. असे असले तरी तो अजून तरी देशांतर्गत आणि आयपीएल लीगमध्ये खेळत आहेत. त्याचबरोबर अजून तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केलेली नाही.
त्याचबरोबर शोएब मलिक सध्या पाकिस्तानच्या वनडे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ सदस्य आहे. त्याने 14 ऑक्टोबर 1999 रोजी वनडेतून आंतरारष्ट्रीय पदार्पण केले होते. तो सध्या 2019 विश्वचषकात पाकिस्तान संघातून खेळत असून या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पण तो टी20 क्रिकेटमध्ये मात्र खेळत राहणार आहे.
त्याचबरोबर युवराजच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर 2000 रोजी विंडीजकडून मार्लन सॅम्युएल या खेळाडूने श्रीलंका विरुद्ध वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
तो सध्या विंडीज संघाचा नियमित सदस्य नसला तरी अजून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलेली नाही. त्याने शेवटचा सामना 14 डिसेंबर 2018 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला आहे.
तसेच विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल सध्या 2019 विश्वचषकात खेळत आहे. त्याचबरोबर त्याची मागील काही सामन्यात कामगिरीही चांगली झाली आहे. त्याने 11 सप्टेंबर 1999 ला भारताविरुद्ध टोरंटो येथे वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच यावर्षी कारकिर्दीतील 5 वा विश्वचषक खेळत असलेला गेल या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
त्यामुळे तसे पहायला गेले तर युवराजच्या आधी पदार्पण केलेले शोएब मलिक आणि ख्रिस गेल हे त्यांच्या राष्ट्रीय संघात सध्या सक्रिय आहेत. तर सॅम्यूएल्स आणि हरभजन मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळत नसले तरी अजून त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली नाही.
युवराज बरोबर आणि युवराजच्या आधी पदार्पण केलेले खेळाडू –
हरभजन सिंग- २५ मार्च १९९८
ख्रिस गेल- ११ सप्टेंबर १९९९
शोएब मालिक -१४ ऑक्टोबर १९९९
मार्लन सॅम्युएल- ०४ ऑक्टोबर २०००
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अशी आहे युवराजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
–आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचा युवराज!
–युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा