इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन विक्रम केला. मात्र, या हंगामात त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली आहे.
डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन केला विक्रम
या महत्वपूर्ण सामन्यात नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि अनुभवी फलंदाज शिखर धवन डावाची सुरुवात करण्यास मैदानात उतरले. मुंबईकडून पहिले षटक फेकणाऱ्या ट्रेंट बोल्टने मार्कस स्टॉइनिसला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला.
आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर याआधी कोणताच फलंदाज बाद झाला नव्हता. त्यामुळे या सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करून बोल्टने विक्रमच केला.
आयपीएल इतिहासात एका हंगामात बोल्टने पॉवरप्लेमध्ये दिले सर्वाधिक चौकार
या हंगामात बोल्टने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने. त्याने या हंगामातील 14 सामन्यात 8 च्या इकॉनॉमीने 22 बळी घेतले आहे. मात्र, या हंगामात त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 62 चौकार दिले आहे. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात कोणत्याही गोलंदाजाने पॉवरप्लेमध्ये दिलेले हे सर्वाधिक चौकार आहेत.
आयपीएलमध्ये एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक चौकार देणारे गोलंदाज :
ट्रेंट बोल्ट : 62 चौकार (सन 2020)
सिद्धार्थ कौल : 61 चौकार (सन 2018)
दीपक चाहर : 60 चौकार (सन 2019)
मिशेल जॉन्सन : 59 चौकार (सन 2013)
उमेश यादव : 58 चौकार (सन 2013)