भारतीय क्रिकेट संघ येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात ते विजेतेपदासाठी न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करतील. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. न्यूझीलंडचा भेदक वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीतून पुनरागमन करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
यापूर्वी बोल्ट इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता इंग्लंडमध्ये त्याला विलगीकरणच्या कालावधीत सूट मिळाल्याने दुसर्या कसोटी सामन्यात खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी एक सामना खेळून बोल्टला इंग्लिश वातावरणाचा अंदाज घेण्याची संधी मिळाली आहे.
आयपीएलनंतर परतला होता मायदेशी
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणारा ट्रेंट बोल्ट यंदाचा आयपीएल हंगाम मध्यातच स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतला होता. इतर खेळाडूंसह तो इंग्लंडमध्ये दाखल झाला नव्हता. याच कारणामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेता आला नाही. मात्र न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड सरकारने बोल्टला विलगीकरणाच्या कालावधीत ४ ते ५ दिवसांची सूट मिळाली आहे. त्यामुळे आता तो सरावाला सुरुवात करु शकतो. मात्र यावरील अंतिम निर्णय गुरुवारी म्हणजेच १० जूनला घेण्यात येईल.
गोलंदाजांवरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान
न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी यावेळी गोलंदाजांवरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. लॉर्डसवरील पहिल्या कसोटी सामन्यात टीम साउदीने ४२ षटके, कायले जेमिसनने ४१ षटके तर नील वॅगनरने ४० षटके गोलंदाजी केली. आता ट्रेंट बोल्टचे दुसर्या सामन्यात पुनरागमन झाल्यास जेमिसन आणि वॅगनर यापैकी एकाच गोलंदाजाला संधी मिळेल. मात्र विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी सगळया गोलंदाजांना तंदुरुस्त ठेवणे, हे न्यूझीलंडचे प्रमुख लक्ष्य असेल.
महत्वाच्या बातम्या:
अखेर बीसीसीआयला आली जाग! वर्षभरानंतर महिला क्रिकेटपटूंना मिळाली त्या स्पर्धेची बक्षीस रक्कम
असे तीन दिग्गज खेळाडू, ज्यांना एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळाली
‘हा’ खेळाडू भारताला जिंकून देईल पहिलेवहिले कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद, दीपक चाहरचा विश्वास