इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरु आहे. या हंगामाच्या उत्तरार्धात जम्मू-काश्मिरचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत आपल्या वेगामुळे सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने यंदाच्या हंगामात ताशी १५२.९५ किमी वेगवान चेंडूही टाकला, जो यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. आता त्याच्या या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले आहे.
उम्रान मलिकला आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. आयपीएल २०२१ चा हंगाम संपल्यानंतर युएई आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच झाली आहे.
उम्रान मलिकच्या कामगिरीचे कौतुक भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही केले होते. त्याने म्हटले होते की त्याच्याकडे आता लक्ष ठेवले पाहिजे.
टी२० विश्वचषकासाठी उम्रान मलिका भारतीय ताफ्यात जोडला जाणार असल्याची पुष्टी बीसीसीआयशी जोडलेल्या एका सुत्राने केली आहे. सुत्राने एएनआयला सांगितले की ‘हो, उम्रान नेट गोलंदाज म्हणून संघाबरोबर राहिल. त्याने आयपीएलमध्ये त्याच्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे. आम्हाला वाटते की फलंदाजांनी नेट्समध्ये त्याचा सामना करणे, चांगली गोष्ट असेल. हा त्याच्यासाठी देखील चांगला अनुभव असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या शानदार फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्याचा त्यालाही बराच अनुभव मिळेल.’
उम्रानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना ९ व्या षटकात देवदत्त पडीक्कलविरुद्ध आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. उम्रान मलिकने सांगितले होते की त्याने नेहमीच वेगवान गोलंदाजी केली आहे. त्याने वयोगटातील क्रिकेटही खेळले असून त्याला इरफान पठाणचेही मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच त्याने याचवर्षी जम्मू-काश्मिरच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले आहे.
त्याने ३ ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याला टी नटराजन आयपीएलमधून बाहेर पडल्याने हैदराबाद संघात संधी मिळाली होती. उम्रानने आयपीएलमध्ये ३ सामने खेळले असून २ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२० मध्ये भारतीय महिलांचा पराभव, ऑस्ट्रेलियाने घेतली मालिकेत आघाडी
Video: सूर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला!