चेन्नई। बुधवारी (२७ जानेवारी) इंग्लंड संघ भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. ते चेन्नईत पोहचल्याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने शेअर केला आहे. इंग्लंड संघ भारताविरुद्ध या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
इंग्लंडच्या कसोटी संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. त्यानंतर ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता श्रीलंकेतून भारतात येण्यासाठी रवाना झाले होते. आता ते चेन्नईत पोहचले असून त्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.
इंग्लंडचे बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर असे काही खेळाडू जे श्रीलंका दौऱ्याचा भाग नव्हते ते याआधीच रविवारी(२४ जानेवारी) चेन्नईत पोहचले होते. ते सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत.
📍 Chennai, India@root66 and the team have arrived in India ahead of our four-match Test series 🇮🇳🏴 pic.twitter.com/GT06p9Ru4u
— England Cricket (@englandcricket) January 27, 2021
याबरोबरच असेही वृत्त समोर येत आहे की भारताचे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू मंगळवारीच चेन्नई येथे पोहचले असून चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत तसेच जसप्रीत बुमराह असे काही खेळाडू बुधवारी सकाळी चेन्नईला पोहचले आहेत. याबरोबरच प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य भारतीय खेळाडूदेखील चेन्नईला येण्यासाठी रवाना झाले आहेत. तर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीही बुधवारी उशिरापर्यंत चेन्नईला पोहचेल.
इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांच्या खेळाडूंना चेन्नईतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. ते २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करु शकतात.
दोन्ही संघात स्टार खेळाडूंचे पुनरागमन
भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. इंग्लंड संघाने जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनला विश्रांती दिली आहे तर जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, रॉरी बर्न्स यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच भारतीय संघातही विराटचे मुलीच्या जन्मानंतर संघात पुनरागमन झाले आहे. तर हार्दिक पंड्या आणि इशांत शर्मा देखील कसोटी संघात परतले आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेल या अष्टपैलू क्रिकेटपटूलाही भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे.
तीन ठिकाणी होणार सामने –
इंग्लंडचा भारत दौरा कोरोनाच्या संकटामुळे तीन ठिकाणीच होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचे पहिले २ सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर अहमदाबाद येथेच ५ टी२० सामने होतील. त्यानंतर पुण्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! आयपीएल २०२१ लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरले; फेब्रुवारीत ‘या’ दिवशी होणार लिलाव
प्रत्येक महिन्यात मिळणार सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीकडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर
रिषभ पंतने सांगितले, ब्रिस्बेन कसोटीत विजयी फटका मारल्यानंतर ‘अशा’ होत्या भावना