पुणे: अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमासाठी कोल्हापुर येथील दुकान मालकाचा मुलगा, असलेल्या विजय हजारे याची निवड मुंबई खिलाडीज संघाच्या कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी त्याने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि संघाच्या महत्वाकांक्षी गोष्टींबद्दल सांगितले.
यावेळी विजय हजारे म्हणाला की, “अल्टीमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्याच मौसमामध्ये मला मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करण्यास मिळत आहे, याविषयी मी शब्दात सांगू शकत नाही. माझी आईसुद्धा खो खो खेळायची, पण त्यावेळी काही अडचणींमुळे ती पुढे खेळू शकली नाही. आता, मला उच्च पातळीवर खेळून तिचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जर ती खेळत असती, तर तिनेदेखील मॅटवरील खो खो खेळण्याचा आनंद नक्कीच घेतला असता, अशी मला खात्री आहे.
रेल्वेत काम करणार्या २६ वर्षीय विजयने पुढे सांगितले की, “माझ्यासाठीचा प्रवास हा खडतर होता, कारण माझ्या वडिलांचे पानाचे दुकान आहे, त्यामुळे आर्थिक अडचणी होत्या. पण, माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत मजल मारू शकलो आहे. माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्याबरोबरच मी माझे वडील आणि कुटुंबाला देखील माझा पाठिंबा देतो आहे, याचा मला आनंद होत आहे.
14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी आपल्या संघाविषयी बोलताना विजय म्हणाला की, “संघ खूप चांगल्या आणि प्रगतीशील मार्गाने तयार होत आहे. एक कर्णधार म्हणून मी सर्वांशी चर्चा करत असून त्यांच्यासमोरील आव्हाने समजून घेण्याचादेखील प्रयत्न करतो. संघातील खेळाडूंचे बॉन्डिंग खरोखरच चांगले आहे आणि या स्पर्धेत आम्ही आमचे सर्वोत्तम देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.” असे त्याने सांगितले.
मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते आणि सहाय्यक प्रशिक्षक शोभी आर यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षणाच्या अनुभवाविषयी बोलताना विजय म्हणाला, ” आमचे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते सर आणि सहाय्यक प्रशिक्षक शोभी सर यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून ते खेळाडूंच्या तांत्रिक गोष्टीबाबतीत तसेच विविध ठिकाणी सुधारणा करण्यावर भर देत आहेत. तसेच, खेळादरम्यान खेळाडूंना आपली भूमिका समजून घेण्यासाठी आणि सरावादरम्यान संयोजन करताना त्याचा ते पाठपुरावा देखील करून घेण्याची खात्री करून घेत आहेत. याशिवाय आम्हाला मैदानाबाहेरही कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची देखील सुनिश्चिती करून घेत आहेत. त्यामुळे, आत्तापर्यंतचा अनुभव आमच्या सर्वांसाठी खूपच चांगला होता.”
संघाचे मालक पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन आणि बॉलीवूड रॅपर बादशाह खेळाडूंना कशा प्रकारे सपोर्ट करत आहेत याबद्दलही त्यांनी आम्हांला सांगितले.
“पुनित सर हे स्वतः एक क्रीडाप्रेमी असल्याने, संघाबाबत सर्व माहिती त्यांच्याकडे असते. तसेच, आमच्या खेळात सुधारणा होत आहे आणि आम्ही आनंदी आहोत, याचीदेखील ते खात्री करून घेत असतात. खो खो हा खेळ देशातील जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोहोचेल, यासाठी आमचे मालक पुनित सर, बादशाह आणि जान्हवी मॅडम आणि आमचे सीईओ, मधुकर सर, हे सर्व प्रयत्न करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांशी संपर्क अभियान हा आमचा पहिला उपक्रम होता आणि पुण्यातील त्या प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व करताना मला खरोखरच चांगले वाटले,” विजयने नमूद केले.
14 ऑगस्ट रोजी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर सलामीच्या सामन्यात मुंबई खिलाडीज संघ गुजरात जायंट्सशी लढणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी! ३३२ सामने पाहिलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड
जेव्हा बलाढ्य इंग्लंडविरुद्ध तळपली होती जम्बोची बॅट, कसोटीत केला होता अजब कारनामा