Rohit Sharma :- भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले आहे. रोहित शर्मा सर्व काही विसरू शकतो, पण गेम प्लॅन कधीच विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
विराट कोहलीचा कार्यकाळ संपल्यानंतर पूर्णवेळ भारतीय कर्णधार बनल्यानंतर रोहितने संघाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप 2023 आणि टी20 विश्वचषक 2024 वर कब्जा केला. तर वनडे विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये उपविजेते ठरले.
राठोड यांनी ‘फाईंड द वे विथ तरूवर कोहली’ या पॉडकास्टवर सांगितले की, रोहितने खेळाडूंचा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. संघात मोकळेपणाचे वातावरण दिले. राठोड पुढे म्हणाले की, संघात सामील झालेल्या प्रत्येक युवा खेळाडूने रोहितचे कौतुक केले आहे. रोहितच्या सहानुभूती दाखवण्याच्या कौशल्याचे देखील त्यांनी कौतुक केले.
राठोड म्हणाले, “नाणेफेक झाल्यावर फलंदाजी करायची की क्षेत्ररक्षण करायचे हा निर्णय रोहित विसरू शकतो. नाणेफेकीच्या वेळी तो खेळाडूंची नावेही विसरतो. अनेकवेळा तो बसमध्ये त्याचा फोन आणि आयपॅडही विसरला आहे. पण तो त्याचा गेम प्लॅन कधीच विसरत नाही. रोहित यात खूप चांगला असून, तो चांगला रणनीतीकार आहे.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “तो संघाच्या रणनीतीवर बराच वेळ घालवतो. रोहित हा गोलंदाज आणि फलंदाजांच्या बैठकीचा भाग असतो. तो गोलंदाज आणि फलंदाजांसोबत बसतो आणि ते काय विचार करत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो खेळाडूंसोबत बराच वेळ घालवतो.”
सध्या विक्रम राठोड हे कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. मात्र, आगामी आयपीएलमध्ये ते एका संघाचे प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात. गुजरात टायटन्स व आरसीबीकडून त्यांना प्रशिक्षकपदाची ऑफर आल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय