मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएलच्या या हंगामात दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या 3 सामन्यात संघाने 2 विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या 4 मध्ये स्थान मिळवले आहे. बेंगलोरसाठी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे, दुसरीकडे एबी डिव्हिलियर्सने फलंदाजीत चुणूक दाखवली आहे.
बेंगलोरची फलंदाजी प्रत्येक हंगामात सर्वोत्तम असते, परंतु त्यांची गोलंदाजी सर्वात वाईट मानली जाते. डेल स्टेनसारखे दिग्गज आणि युजवेंद्र चहल यांच्यासारख्या हुशार गोलंदाजांचा संघात समावेश आहे. दरम्यान, गोलंदाजांमध्ये आत्मविश्वास वाढविल्याबद्दल चहलने कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले. चहलने पत्रकार परिषदेत सांगितले, “विराट भैय्या सर्व गोलंदाजांना पाठिंबा देतो आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो.”
लेगस्पिनर युजवेंद्र चहल या संदर्भात पुढे म्हणाले की,”तो नेहमीच आपल्या गोलंदाजांना सांगतो की, तुम्ही गोलंदाज स्वत: एक कर्णधार आहात. तुम्हाला पाहिजे तशी गोलंदाजी करा आणि मैदानात क्षेत्ररक्षणही लावा. मी गेली सहा वर्षे बेंगलोरकडून खेळत आहे. विराट भैय्या नेहमी आत्मविश्वासाने भरलेला असतो. त्यांचा असा विश्वास आहे की, तुम्ही प्रथम तुमच्या नियोजनानुसार गोलंदाजी करा, त्यात यश आले नाही तर आपण प्लॅन बी नुसार गोलंदाजी करुयात. एक गोलंदाज आणि एक तरुण खेळाडू म्हणून तुम्हाला असाच कर्णधार हवा असतो.”
आपल्या कर्णधारावर कौतुकाची फुले उधळणाऱ्या चहलने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत तो 5 व्या स्थानावर आहे. त्याने पहिल्या 3 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. आरसीबीचा पुढचा सामना 3 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा तो चमकदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न करेल.