क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील दुसरी लढत सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) इंग्लंड संघातील गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून देत भारतीय संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक करण्यापासून वंचित राहिलेला कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतला. तरीदेखील त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. शतक सोडा तर अर्धशतक झळकावण्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागत आहे. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी खेळी न करता देखील २१ वर्ष जुना विक्रमाची बरोबरी केली आहे.(Virat Kohli breaks 21 years old record,after scoring 50 plus runs in lords)
मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ४२ धावांची खेळी केली होती. त्यांनतर तो बाद होऊन माघारी परतला होता. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, तो २० धावा करत माघारी परतला. त्याने दोन्ही डावात मिळून या सामन्यात ६२ धावा केल्या.
त्यामुळे १९९० नंतर विराट कोहली पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याने लॉर्ड्सच्या मैदानावर दोन्ही डावात मिळून ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. १९९० मध्ये हा कारनामा मोहम्मद अझहरुद्दीन यांनी केला होता.
भारताकडे १५४ धावांची आघाडी
भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले आहे. जो रुटच्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ३९१ धावा केल्या होत्या. यासह २७ धावांची आघाडी देखील घेतली होती.
दुसऱ्या डावात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा लवकर माघारी परतले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, विराट लवकर बाद झाला. पण असे असले तरी पुजारा आणि अजिंक्य रहाणेने १०० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला.
पण चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोघेही बाद झाले. पुजारा ४५ धावा करुन, तर रहाणे ६१ धावा करुन बाद झाला. दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.
आता अखेरच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य असल्याने सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरारा..खतरनाक!! रूटने मारलेला अप्रतिम शॉट पाहून सिराजसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना ‘या’ कारणामुळे करण्यात आले ट्रोल
‘किंग’ कोहलीने स्लीपमध्ये टिपला ‘अविश्वसनीय’ झेल, मोईन अलीलाही बसला नव्हता विश्वास, पाहा व्हिडिओ