भारतीय संघाचा (team india) दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यामुळे सर्वजन हैराण आहेत. मागच्या काही महिन्यांपूर्वी विराटने भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. आता यापाठोपाठ त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा देखील त्याग केला आहे. मागच्या चार महिन्यांपूर्वी भारतीय संघातील सर्वात ताकदवान खेळाडू असलेला विराट, आता एकाही प्रकारामध्ये संघाचे नेतृत्व करणार नाही. अशात चाहत्यांना त्याच्या या निर्णयानंतर अनेक प्रश्न पडले आहेत.
विराटने सप्टेंबर २०२१ मध्ये स्वतःच्या इच्छेने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. पण त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने विराटची इच्छा नसताना देखील एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून हिरावून घेतले होते. अशातच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयामागचे खरे कारण विराटला माहिती आहे, पण याबाबतीत सध्या अनेक चर्चा होत आहेत. आपण या लेखात विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्यामागच्या चार संभावित कारणांचा विचार करणार आहोत.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’ ।
संघात विराटची एकहाती सत्ता उरली नव्हती
मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संपल्यानंतर विराटने स्वेच्छेने टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तो एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम होता. पण बोर्डाने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून देखील हटवले. टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले गेले. यानंतर रोहितचे संघातील वजन पहिल्यापेक्षा अधिक वाढले. यापूर्वी विराटची संघात एकहाती सत्ता असल्यासारखी परिस्थिती होती, परंतु रोहित दोन प्रकारांतील कर्णधार बनल्यानंतर हे चित्र बदलले होते.
बीसीसीआयसोबत निर्माण झालेले मतभेद
एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराट आणि बीसीसीआयमधील मतभेद जगासमोर आले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सांगितले होते की, त्यांनी स्वतः विराटला विनंती केली होती की, त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये. गांगुलींच्या म्हणण्याप्रमाणे बोर्डाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक कर्णधार हवा असल्यामुळे रोहतला ही जबाबदारी दिली गेली.
परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटने याबाबत स्पष्टीरकण देताना सांगितले की, त्याच्यासोबत टी-२० संघाचे कर्णधार सोडण्याविषयी कोणतीच चर्चा केली नव्हती, तसेच एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वी देखील त्याला पूर्वकल्पना दिली गेली नव्हती. या संपूर्ण प्रकारानंतर विराट नक्कीच बीसीसीआयच्या निशाण्यावर आला असावा आणि त्याला बोर्डाकडून अपेक्षित सहकार्य देखील मिळत नसावे.
हेही वाचा- ‘त्या’ एका ट्वीटमुळे बदललं सर्वकाही, विराटनंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये सुरू होणार रोहितपर्व!
खराब फॉर्म
विराट कोहली मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी एकामध्येही शतक केलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन जास्तच खराब दिसले. या काळात विराट कसोटी सामन्यांमध्ये एकाच प्रकारचा शॉट खेळण्याच्या नादात अनेकदा बाद झाला. अशातच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर त्याच्याकडून स्वतःची चूक सुधारण्याची अजून एक संधी निसटली.
रवी शास्त्रींनी संघाची साथ सोडल्यामुळे समीकरण बदलले
टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. यानंतर रवी शांस्त्रींचा संघासोबतचा मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील प्रवास देखील संपला. मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर विराट आणि शास्त्रींची जोडी देखील तुटली. या दोघांनी एकत्र काम करताना भारतीय संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. शास्त्रींनंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे, पण विराटला शास्त्रींप्रमाणे साथ मिळाली नसावी. प्रशिक्षकपद नवीन व्यक्तीकडे गेल्यानंतर संघातील समीकरणे बदलली आणि विराटकडे आधीसारखे पाठबळ उरले नसावे.
महत्वाच्या बातम्या –
ऐकलंत का? धोनी नव्हे विराटने आपल्या मोठ्या निर्णयाविषयी सर्वात आधी ‘या’ व्यक्तीला दिलेली माहिती
व्हिडिओ पाहा –