अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला ८ गड्यांनी पराभूत करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली अष्टपैलू शार्दुल ठाकूरवर रागवलेला दिसून आला. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अशी घडली घटना
भारतानं दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना दोन गडी बाद झाल्यानंतर सलामीवीर जोस बटलर व जॉनी बेअरस्टोने इंग्लंडचा डाव सांभाळला. इंग्लंडच्या डावाच्या बाराव्या षटकात युजवेंद्र चहलने टाकलेला चेंडू बेअरस्टोने स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला. यष्टीरक्षक रिषभ पंत चेंडूच्या मागे गेला.
मात्र, फाईन लेगला उभ्या असलेल्या शार्दुल ठाकूरने धावत येऊन तो चेंडू खेळपट्टीकडे फेकला. त्याने केलेला थ्रो नॉन स्ट्राइक एंडला असलेल्या चहलकडे जायला हवा होता. मात्र, तो चेंडू खेळपट्टीच्या मधोमध टप्पा पडत कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलच्या हाती गेला. त्यानंतर, विराट शार्दुलवर कमालीचं नाराज दिसला व त्याच्याकडे पाहून रागात काहीतरी बोलला.
https://twitter.com/ribas30704098/status/1371980865367064579
महागडा ठरला शार्दुल
तिसऱ्या टी२० सामन्यात शार्दुल ठाकूर गोलंदाजीमध्ये अत्यंत महागडा ठरला. त्याने ३.२ षटके गोलंदाजी करत ३६ धावा लुटविल्या. त्याला एकही बळी मिळवता आला नाही. तसेच, त्याचे क्षेत्ररक्षणही अपेक्षेनुसार झाले नाही. ४ षटकात ४१ धावा दिलेल्या युजवेंद्र चहल व शार्दुल यांच्यावर पुढील सामन्यात संघातून बाहेर पडण्याची नामुष्की आली आहे.
इंग्लंडची मालिकेत आघाडी
मालिका १-१ अशा बरोबरीत असताना तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सहजरीत्या पराभूत केले. भारताने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद ८३ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जॉनी बेअरस्टोने नाबाद ४० धावा बनविल्या. उभय संघामधील चौथा सामना १८ मार्च रोजी खेळविला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
‘या’ कारणामुळे कोहलीने आपला क्रमांक ईशान किशनला दिला, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
आयसीसी टी२० क्रमवारी : भारतीय कर्णधार विराट कोहलीची आगेकूच, तर केएल राहुलची घसरण