मागील काही काळापासून भारतीय संघातील सर्वाधिक सुधारणा झालेला क्रिकेटपटू म्हणून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे पाहिले जाते. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यापासून त्याच्या कामगिरीत सातत्य आले आहे. सिराजच्या गोलंदाजीची धार कशी वाढली आहे, याचा अंदाज २०२१ आयपीएलमध्ये सर्वांना आला. त्याच वेळी सिराजने आपल्या या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला दिले. विराटने आपल्याला कठीण काळात खूप मदत केली असे त्याने म्हटले.
विराटने दिली माझी साथ
आपल्या अप्रतिम गोलंदाजीने आयपीएल २०२१ गाजवलेल्या सिराजने नुकतीच एका अग्रणी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्याने विराटचे कौतुक केले. सिराज म्हणाला, “आज मी जे काही आहे ते केवळ विराट भैय्यामुळे आहे. त्याने माझी साथ दिली आणि मला सांभाळले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले. मी माझ्या रूममध्ये रडत असताना अचानकपणे विराट भैया आतमध्ये आला आणि त्याने मला मिठी मारत म्हटले, सर्व काही ठीक होईल. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत.”
आयपीएलमध्ये देखील विराट नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सिराज भाग आहे. तो पुढे म्हणाला, “आत्ताच्या आयपीएलवेळी तो सातत्याने मला मोक्याच्या क्षणी गोलंदाजी द्यायचा. चेन्नई विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने माझे कौतुक केलेले. त्याने मला इंग्लंड दौऱ्यासाठी तयार राहण्याचे देखील म्हटले होते. याच विश्वासामुळे मला अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.”
उत्कृष्ट गोलंदाज बनला आहे सिराज
हैदराबादसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा सिराज २०१८ पासून आरसीबी संघाचा भाग आहे. पहिली दोन वर्ष खराब कामगिरी केल्यानंतर ही विराटने त्याला संघात कायम ठेवले. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मागील हंगामापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२० च्या अखेरीस झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी पदार्पण केले व तीन सामन्यांमध्ये १३ बळी आपल्या नावे केले. आयपीएलमध्ये देखील डेथ ओव्हर्समध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 3 भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दरवाजे झाले कायमचे बंद
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा सनसनाटी आरोप, म्हणाला भारतीय खेळाडू बायोबबलमध्ये
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?