भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंदोर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल. मात्र, हा विक्रम फलंदाजीतील नसून क्षेत्ररक्षणातील असेल.
इंदोर कसोटीत मैदानात उतरल्यानंतर विराट कोहली याच्या नजरेत क्षेत्ररक्षणातील एक मोठा विक्रम असेल. विराट या सामन्यात एक झेल घेतल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाशिवाय 300 झेल पूर्ण करणारा दुसरा भारतीय बनेल. भारताकडून यापूर्वी विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 334 आंतरराष्ट्रीय झेल टिपले आहेत. जागतिक क्रिकेटचा विचार केल्यास अशी कामगिरी करणारा तो सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत तब्बल 440 झेल टिपले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगच्या नावे 364 व तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडच्या रॉस टेलरच्या नावे 351 झेल आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (338 झेल) व राहुल द्रविड यांचा क्रमांक लागतो. विराटने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत कसोटीत 108, वनडेत 141 व टी20 मध्ये 50 असे 299 झेल टिपले आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला डोके वर न काढू देता प्रत्येकी तीन दिवसात दोन्ही सामन्यांचा निकाल लावला. तिसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचू शकतो. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारतीय संघाची जागा देखील पक्की होईल.
(Virat Kohli Need 1 Catch To Complete 300 International Catches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख
राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्याचा अर्थ काय? मौन सोडत रोहित स्पष्टच बोलला, ‘त्याला महत्त्वच देऊ नका’