भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगभरात खूप प्रसिद्ध आहे. विराटचे जगभरात खूप चाहते आहेत. अनेक युवा खेळाडूंचा विराट आदर्श आहे. सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटीपर्यंत विराटचे अनेक चाहते आहेत. इतकेच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर देखील विराटचे चाहते आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक चाहता सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे अमेरिकन रेसलर जॉन सीना. जॉन सीना विराट कोहलीचा चाहता आहे, याचा पुरावा त्याने काही दिवसांपूर्वी दिला होता. 7 जुलै 2019 मध्ये विराटचा फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता, यासाठी कोणतेही कॅप्शन लिहिले नव्हते.
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) सुपरस्टार जॉन सीना याने केलेली ही जुनी पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराटच्या फोटोने प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. विराटचा हा फोटो इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मधील आहे. यामध्ये विराटसोबत रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री देखील दिसून येत आहेत.
विराटने 2008 पासून मागे वळून पाहिलेच नाही
मलेशिया येथे 2008 ला 19 वर्षांखालील विश्वचषकात कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्या विश्वचषकात भारताने विजेतेपद मिळवले होते. काही महिन्यांनंतर त्याने वयाच्या 19 व्या वर्षी श्रीलंकेविरूद्ध भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला भारतीय संघात राखीव फलंदाज म्हणून खेळल्यानंतर त्याने लवकरच एकदिवसीय सामन्यात आपले स्थान पक्के केले. त्याने 2011 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. तसेच 2013 मध्ये प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचला. एवढेच नाही तर टी20 क्रिकेटमध्येही त्याने आपली छाप पाडली. त्याने 2014 आणि 2016 या दोन वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.
साल 2017 मध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर मर्यादित षटकांचा तो नियमित कर्णधार झाला. तत्पूर्वी धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतल्याने तेव्हापासून तो कसोटी संघाचा नियमित कर्णधार आहे. तसेच कसोटीतील भारताचा तो सर्वात यशस्वी कर्णधारही आहे.
कोहलीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अर्जुन पुरस्कार(2013), आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर(2017-18), पद्मश्री पुरस्कार (2017), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2018).
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, टी नटराजन यांना मिळाले नाही टीम इंडियात स्थान, ‘हे’ आहे कारण
‘या’ फलंदाजांकडे आहे रोहितचा २६४ धावांचा विश्वविक्रम मोडण्याची क्षमता
भारतीय संघात प्रथमच निवड होऊनही चेतन सकारियाने व्यक्त केली ‘ही’ खंत