अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ मार्चपासून कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत सध्या २-१ अशा फरकाने भारतीय संघ आघाडीवर आहे. असे असले तरी, या मालिकेत सामन्यांतील खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा झाली. आता याबद्दल चौथ्या कसोटीच्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबादच्या खेळपट्टीवरुन वाद शिगेला
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिले दोन सामने चेन्नईला पार पडले. तर तिसरा सामना अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवरच झाला. या तिन्ही सामन्यांच्यावेळी खेळपट्टीबद्दल चर्चा रंगली. पण त्यातही तिसऱ्या सामन्यानंतर या चर्चेने वेगळा स्तर गाठला.
तिसरा कसोटी सामना २ दिवसातच भारताने १० विकेट्सने जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून गेलेल्या ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजांना काहीच मदत नव्हती, खेळपट्टी केवळ फिरकी गोलंदाजांना अनुकुल होती, अशा टीका झाल्या. त्यावर आर अश्विनने टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिले. तसेच अन्य भारतीय संघातील खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली.
विराटने दिली प्रतिक्रिया
भारतीय संघाचा कर्णधार विराटला खेळपट्टीबाबत चौथ्या कसोटीआधी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपण ५ दिवस सामना चालावा म्हणून खेळतो की सामना जिंकावा म्हणून खेळतो?’
तसेच विराट म्हणाला, ‘मला विश्वास आहे फिरकीला अनुकुल खेळपट्टीबद्दल नेहमीच खूप चर्चा होते. आपल्या संघाच्या यशाचे कारण हे आहे की आपण खेळपट्टीचे कारण पुढे करत नाही. आपण आपल्यात सुधारणा करतो.’
तसेच विराटने पुढे न्यूझीलंडविरुद्ध ३ दिवसात सामने संपल्याची आठवण करुन देताना म्हटले, ‘आम्ही न्यूझीलंडमध्ये ३ दिवसात पराभूत झालो. त्यावेळी कोणीही खेळपट्टीबद्दल बोलले नाही. तेव्हा फलंदाजांच्या तंत्रावरच टीका झाली. त्यावेळी फक्त भारत न्यूझीलंडमध्ये किती वाईट खेळला, असेच म्हटले गेले. त्यावेळी कोणीही खेळपट्टीबद्दल टीका केली नव्हती. खेळपट्टी कशी आहे, चेंडू किती मूव्ह होत आहे, खेळपट्टीवर किती गवत आहे, हे पाहायला कोणी आले नव्हते.’
भारताने मागीवर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौरा केला होता. त्या दौऱ्यात भारताला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने पराभूत व्हावे लागले होते. हे दोन्ही कसोटी सामने ३ दिवसात संपले होते.
त्याचबरोबर तिसरा कसोटी सामना दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूने खेळण्यात आला होता आणि आता चौथा सामना सर्वसाधारण कसोटीसारखा असल्याने लाल चेंडूने खेळला जाणार आहे. याबद्दल तो म्हणाला, ‘मला समजत नाही की चेंडू, खेळपट्टी यावर खूप लक्ष का दिले जाते. आपण फलंदाजामध्ये इतके कौशल्य नव्हते की तो विशिष्ट खेळपट्टीवर खेळू शकला नाही, यावर लक्ष का देत नाही. दोन्ही संघाचे फलंदाजी प्रदर्शन खराब होते.’
पुढे विराट म्हणाला, ‘चेंडू गोल असतो, सारख्या वजनाचा असतो. त्यामुळे मला वाटत नाही की त्याने फार मोठा फरक पडतो. चेन्नईची खेळपट्टी वेगळी होती. मोटेराची खेळपट्टी (नरेंद्र मोदी स्टेडियमची) सर्वसाधारणपणे वेगवान असते, आणि हे सर्व खेळपट्टीवर असणाऱ्या मातीमुळे होते.’
???? "Unfortunate that there’s too much noise about spinning tracks."
Ahead of the fourth @Paytm #INDvENG Test, #TeamIndia skipper @imVkohli weighs in on the discussion about pitches. pic.twitter.com/tcra6nj5Ys
— BCCI (@BCCI) March 3, 2021
भारत विरुद्ध इंग्लंड संघात आता उर्वरित शेवटचा कसोटी सामना ४ मार्चपासून होणार आहे. हा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळल्याचा वॉर्नरला होतोय पश्चाताप, ‘हे’ आहे कारण
गोलंदाजाने टाकला ‘असा’ घातक यॉर्कर की स्टंप्स चक्काचूर, एकदा व्हिडिओ पाहाच






