बुधवारी (३ नोव्हेंबर) अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान संघावर ६६ धावांनी शानदार विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा काहीशा जिवंत केल्या. भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत हा विजय संपादन केला. या सामन्यातून तब्बल चार वर्षानंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचे भारतीय कर्णधार विराट कोहली याने तोंडभरून कौतुक केले.
अश्विनची किफायतशीर गोलंदाजी
तब्बल चार वर्षानंतर टी२० संघात निवड झाल्यानंतर अश्विनने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले. वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. त्याने, आपल्या चार षटकांत गुलबदीन नईब व नजीब झादरान यांचे बळी मिळवताना केवळ १४ धावा दिल्या.
विराटने केले कौतुक
सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली याने अश्विनचे कौतुक केले. तो म्हणाला,
“या सामन्यातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे अश्विनचे फॉर्ममध्ये येणे. तो ज्यावेळी अशी उत्कृष्ट कामगिरी करतो त्यावेळी संघाला नेहमीच फायदा होतो. तो मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याबरोबर धावादेखील रोखतो. तो एक हुशार गोलंदाज आहे. मला आनंद आहे की तो आपल्या लयीमध्ये दिसतोय.”
भारतीय संघाने उघडले गुणांचे खाते
अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण मिळाले. रोहित शर्मा व केएल राहुल या दमदार जोडीने भारतीय संघाला १४० धावांची सलामी दिली. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. त्यानंतर, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी ६३ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला २१० धावांची मजल मारून दिली. त्यानंतर रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव १४४ धावांवर रोखला. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी मिळविले. ७४ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले
महत्त्वाच्या बातम्या-
‘प्रशिक्षक’ राहुल द्रविड मिळवून देऊ शकतो ‘विश्वचषक’, पण पार करावी लागतील ‘ही’ पाच आव्हाने
‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा






