भारतीय संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सर्वप्रथम विश्व कसोटी अजिंक्यपद फेरीचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडशी दोन हात करेल. मात्र कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने दौऱ्यापूर्वी खेळाडूंना बायो बबलमध्ये राहणे आवश्यक आहे.
याचाच भाग म्हणून सगळे भारतीय संघातील सगळे खेळाडू सध्या मुंबईत विलगीकरणात राहत आहेत. या काळात विरंगुळा म्हणून ते चाहत्यांशी गप्पा देखील मारत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील हा मार्ग निवडत इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यातील एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर कोहलीने दिलेले उत्तर आता चर्चेचा विषय ठरते आहे.
“गूगलवर शोधलेली शेवटची गोष्ट कोणती?
विराट कोहलीने काल (२९ मे) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. आणि त्यातील निवडक प्रश्नांची उत्तरे दिली होती. यावर अनेक चाहत्यांनी प्रश्नांचा वर्षाव केला. यात एका चाहत्याने कोहलीला ‘शेवटची गूगलवर सर्च केलेली गोष्ट कोणती?’ असा प्रश्न विचारला.
कोहलीने देखील यावर तात्काळ उत्तर दिले. कोहलीने यावर दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव घेतले. रोनाल्डोच्या ट्रान्सफर बाबत शेवटचा गूगल सर्च केल्याचे यावेळी कोहलीने सांगितले. त्याच्या या उत्तराची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डो हा सध्या जगातील आघाडीचा फुटबॉलपटू आहे. सध्या युवेंट्स क्लबमधून त्याची दुसरीकडे ट्रान्सफर झाल्याची चर्चा सुरू होती. कदाचित म्हणूनच कोहलीने गूगल सर्च करत याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
इतरही प्रश्नांची दिली उत्तरे
या प्रश्नाव्यतिरिक्त चाहत्यांनी कोहलीला इतरही अनेक प्रश्न विचारले. ज्यात ‘वामिकाची झलक कधी पाहायला मिळणार’, ‘तुझं डायट काय’, ‘भारतीय संघाचे एखादे सिक्रेट सांग’, अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता. या सगळया प्रश्नांची कोहलीने दिलखुलासपणे उत्तरे दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंत याने मारलेत सर्वाधिक षटकार, दोन भारतीयांचा समावेश
दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत
संकटमोचक यूएई! तिसऱ्यांदा भूषवणार आयपीएलचे यजमानपद, दोन वेळा ‘या’ कारणाने झाले होते आयोजन