भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज तिन्ही स्वरूपात जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. २०१२ मध्ये ९ वर्षांपूर्वी विराट कोहलीने एक अशी खेळी खेळली होती, ज्याने हे सिद्ध केले की, तो भविष्यात सचिन तेंडुलकरसारखा महान फलंदाज म्हणून पुढे येईल. या घटनेला आज म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी १० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१२ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ बँक तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात डोंगराएवढा लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने वेगवान शतकी खेळी करत भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला होता.
अंतिम फेरीत प्रवेशासाठी भारतीय संघापुढे होती अवघड समीकरणे
ऑस्ट्रेलियामध्ये भारत, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कॉमनवेल्थ बँक नावाची तिरंगी मालिका खेळली जात होती. मालिकेतील दहाव्या साखळी सामन्यापर्यंत ऑस्ट्रेलिया सरस धावगतीमुळे अंतिम फेरीसाठी प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झालेली. साखळी फेरीतील अकरावा सामना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होणार होता. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंका अंतिम फेरीसाठी आपले स्थान पक्के करण्यास आतूर होती तर भारतीय संघाला मोठ्या विजयाची गरज होती. जेणेकरून भारताला बोनस पॉईंट मिळेल. जरी, भारतीय संघ विजय झाला तरी अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत करावे अशी देखील प्रार्थना करावी लागणार होती.
श्रीलंकेची प्रथम फलंदाजी
होबार्टच्या मैदानावर दिवस-रात्र स्वरूपाच्या या सामन्यात भारतीय कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून सलामीवीर म्हणून तिलकरत्ने दिलशान व माहेला जयवर्धने यांनी डावाची सुरुवात केली. १२ षटकात ४९ धावांची भागीदारी करून जयवर्धने बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरला अनुभवी यष्टीरक्षक कुमार संगकारा.
दिलशान आणि संगकारा या जोडीने त्यानंतर सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. जहीर खान, प्रवीण कुमार, उमेश यादव, आर अश्विन, रवींद्र जडेजा या प्रमुख गोलंदाजांसह वीरेंद्र सेहवाग व सुरेश रैना यांनी देखील गोलंदाजी केली. मात्र, हे सर्वजण मिळून दिलशान व संगकारा यांना दुसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी करण्यापासून रोखू शकले नाहीत. संगकाराने ८५ चेंडूत १०५ धावांची आक्रमक खेळी केली तर दिलशानने अखेरपर्यंत नाबाद राहत १६० भावांची सर्वांगसुंदर खेळी साकारली. श्रीलंकेने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३२० धावा ठोकल्या.
भारतासमोर अंतिम फेरीचे आव्हान
भारतीय संघाला बोनस पॉइंटसह विजय मिळवायचा असेल तर हे आव्हान ३७ षटकात पार करणे गरजेचे होते. भारताचा अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर यांनी आक्रमक सुरुवात केली. सेहवागने १६ चेंडूत ३० तर सचिनने ३० चेंडूत ३९ धावा करत तंबूचा रस्ता धरला. भारतीय संघाने पहिल्या दहा षटकांत ८६ धावा फटकावून विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यासाठी दोन्ही सलामीवीरांचा बळी मात्र संघाला द्यावा लागला.
कोहलीची ‘विराट’ खेळी
दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर दोन दिल्लीकरांनी मैदानात तळ ठोकला. एक होता अनुभवी गौतम गंभीर तर दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिभावंत खेळाडू म्हणून पुढे येत असलेला विराट कोहली. विराटने पहिल्यापासून श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे गंभीर अत्यंत गांभीर्याने खेळत होता. दोघांनी मिळून २७ व्या षटकात भारताची धावसंख्या दोनशेच्या पलीकडे नेली. गंभीर ६३ धावा करून परतला मात्र भारतीय संघ बोनस पॉइंटसह विजय मिळू शकतो, अशी आशा त्याने निर्माण केली होती.
गंभीर परतल्यानंतर दुसरा डावखुरा फलंदाज सुरेश रैना विराटच्या साथीला आला. दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ पिसे काढली. दरम्यान विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील नववे शतक साजरे केले. रैनादेखील खराब चेंडूंचा व्यवस्थित समाचार घेत होता. दोघांनीही अजिबात दयामाया न दाखवता मोठ्या विजयाच्या निर्धाराने आक्रमक फलंदाजी करत ३६.४ षटकात भारताला विजयी लक्ष पार करून दिले.
आपल्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय खेळी खेळत विराट कोहलीने फक्त ८६ चेंडूमध्ये नाबाद १३३ धावा ठोकल्या. ज्यामध्ये १६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. या खेळी दरम्यान विराटचा स्ट्राइक रेट १५४ चा राहिला. रैनाने त्याला तोलामोलाची साथ देत २४ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावा फटकावल्या.
मलिंगासाठी न विसरणारा दिवस
या सामन्यात विराटने श्रीलंकेचा अव्वल वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची मनसोक्त धुलाई केली. मलिंगाने टाकलेले ३५ वे षटक कोणताही क्रिकेटप्रेमी अजूनही विसरला नसेल. विराटने या षटकात २,६,४,४,४,४ अशा रीतीने २४ धावा लुटल्या. या षटकामुळे भारत बोनस पॉईंट मिळवून हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित झाले होते. संपूर्ण सामन्यात मलिंगाने ७.४ षटके गोलंदाजी करताना तब्बल ९६ धावा दिल्या होत्या.
भारत नाही पोहोचला अंतिम फेरी
भारताने या सामन्यात बोनस पॉईंटने विजय मिळवला तरी, मालिकेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने यजमान ऑस्ट्रेलियाला ९ गड्यांनी पराभूत करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. ‘बेस्ट ऑफ थ्री’ अशा पद्धतीने झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला २-१ अशा फरकाने पराभूत करत मालिकेवर कब्जा केला.
विराट कोहलीच्या या खेळीने हे मात्र सुनिश्चित केले की, सचिन तेंडुलकर जरी आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असला तरी, भारतासाठी नवा तितक्याच ताकतीचा ‘मॅचविनर’ तयार झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष : कर्णधारपद नाकारतच बोर्डाची झाली खप्पामर्जी अन् अकाली संपली अझर मेहमूदची कारकीर्द