शारजाह। शनिवारी (३० ऑक्टोबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत शारजाह क्रिकेट मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. हा सामना अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने हॅट्रिक घेत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
झाले असे की श्रीलंकेने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला विकेट्स गमावल्या होत्या. पण, नंतर कर्णधार तेंबा बाऊमा आणि एडेन मार्करमने डाव सावरला होता. मात्र, १५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हसरंगाने मार्करमला १९ धावांवर खेळत असताना त्रिफळाचीत केले.
यानंतर त्याने १८ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हाती घेतला. यावेळी देखील बाऊमाने डेव्हिड मिलरला साथीला घेत डाव पुढे नेला होता. पण, हसरंगाने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाऊमाला पॅथम निसंकाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे बाऊमा ४६ धावांवर झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर हसरंगाने नवा फलंदाज ड्वेन प्रीटोरियसला भानुका राजपक्षकडे झेल द्यायला लावला. प्रीटोरियस पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. याबरोबरच हसरंगाने हॅट्रिक साधली.
हसरंगा यंदाच्या टी२० विश्वचषकात हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने नेदरलँड्सविरुद्ध ४ चेंडूंत ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
याशिवाय हसरंगा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा एकूण तिसरा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी कॅम्फर आणि ब्रेट लीने असा कारनामा केला आहे. ब्रेट लीने २००७ च्या टी२० विश्वचषकात केपटाऊन येथे बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
इतकेच नाही तर, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक साधणारा हसरंगा चौथा श्रीलंकन गोलंदाज आहे. यापूर्वी थिसरा परेरा, लसिथ मलिंगा आणि अकिला धनंजय यांनी हा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे मलिंगाने दोन वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हॅट्रिक घेतली आहे. यातील एकदा त्याने ४ चेंडूत सलग ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
श्रीलंकेचा पराभव
हसरंगाने या सामन्यात हॅट्रिक घेतली असली तरी, दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या षटकात डेव्हिड मिलरच्या आक्रमणामुळे विजय मिळवला. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १५ धावांची गरज असताना मिलरने २ षटकार ठोकले. आणि षटकातील पाचव्या चेंडूवर कागिसो रबाडाने विजयी चौकार मारला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना सहज जिंकला. मिलर २३ धावांवर आणि रबाडा १३ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून हसरंगाने ३ विकेट्स घेतल्या आणि दुशमंथा चमिराने २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून पाथम निसंकाने एकाकी झुंज देताना ५८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिस्त चरिथ असलंका आणि कर्णधार दसून शनका यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. असलंकाने २१ धावा केल्या आणि शनकाने ११ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रीटोरियस आणि तब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किएने २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय
टी२० विश्वचषक: हसंगाच्या हॅट्रिकवर मिलरचे षटकार भारी! दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय
दु:खद! एका कसोटीत १०० धावा अन् १० विकेट्स घेणाऱ्या दिग्गज ऑसी क्रिकेटरने निधन





