भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने शतक साजरे केले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने दमदार फटकेबाजी केली. त्यामुळे सुंदर आता आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावेल अशी सर्वांचा अपेक्षा होती. परंतु अक्षर पटेल बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंच्या पटापट विकेट्स गेल्याने अवघ्या ४ धावांनी त्याचे शतक हुकले. यानंतर एका नव्या विक्रमाच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.
वरची आणि मधळी फळी बाद झाल्यानंतर सुंदर खालच्या फळीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर सुदंर ११७ चेंडूत ६० धावांवर नाबाद होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी अष्टपैलू अक्षर पटेलसोबत मिळून आक्रमक फटके मारत त्याने संघाला ३५० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र डावाच्या ११४ व्या षटकात अक्षर ४३ धावांवर धावबाद झाला. त्या पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्सने इशांत शर्माला पायचीत केले.
त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद सिराज देखील फार काही करु शकला नाही. त्याला देखील स्टोक्सनेच त्रिफळाचीत करत भारताचा डाव ३६५ धावांवर संपवला. मात्र यामुळे सुंदरचे शतक थोडक्यात हुकले. तो १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ९६ धावांवर नाबाद राहिला.
यासह संघसहकारी बाद झाला झाले असताना नव्वदीत नाबाद राहण्याचा विक्रम सुंदरच्या नावावर जमा झाला आहे. त्याच्यापुर्वी गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर आणि आर अश्विन यांच्याबाबतीत असे घडले आहे. सर्वप्रथम विश्वनाथ १९७४-७५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९७ धावांवर नाबाद राहिले होते. तर वेगसरकर यांचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले होते. तसेच ९ वर्षांपुर्वी म्हणजे २०१२-१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध अश्विन ९१ धावांवर नाबाद राहिला होता.
संघसहकारी न उरल्याने नव्वदीत नाबाद राहिलेले भारतीय फलंदाज
गुंडप्पा विश्वनाथ- नाबाद ९७ विरुद्ध वेस्ट इंडिज (चेन्नई, १९७४-७५)
दिलीप वेगसरकर- नाबाद ९८ विरुद्ध श्रीलंका (कोलंबो, १९८५)
आर अश्विन- नाबाद ९१ विरुद्ध इंग्लंड (कोलकाता, २०१२-१३)
वॉशिंग्टन सुंदर- नाबाद ९६ विरुद्ध इंग्लंड (अहमदाबाद, २०२०-२१)
याबरोबरच कसोटीत नव्वदीत नाबाद राहण्याच्या विक्रमाचीही सुंदरच्या खात्यात भर पडली आहे. यात सुंदरसहित विश्वनाथ, वेंगसरकर आणि अश्विनचा समावेश आहे. सोबतच अजित वाडेकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड हे माजी भारतीय फलंदाजही या यादीत सहभागी आहेत.
कसोटीत नव्वदीत नाबाद राहणारे भारतीय फलंदाज
अजित वाडेकर- नाबाद ९१
गुंडप्पा विश्वनाथ- नाबाद ९७
दिलीप वेंगसरकर- नाबाद ९८
सौरव गांगुली- नाबाद ९८
राहुल द्रविड- नाबाद ९१
आर अश्विन- नाबाद ९१
वॉशिंग्टन सुंदर- नाबाद ९६
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी ५० वर्षांपुर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा
चेंडू बघा, शॉट मारा; धुव्वाधार शतकानंतर रिषभने सांगितली आपल्या फलंदाजीची विशेषता





